शरद पवार यांची मंडल यात्रा म्हणजे फुसका बार : बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 14:58 IST2025-08-11T14:56:35+5:302025-08-11T14:58:08+5:30
Amravati : ४० वर्षे सत्तेत असताना ओबीसी समाजासाठी काय केले याचे उत्तर द्यावे

Sharad Pawar's Mandal Yatra is a false bar: Bawankule
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शरद पवार हे ४० ते ५० वर्षे सत्तेत होते. त्या काळात ओबीसी समाजासाठी काय केले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. आधी मराठा समाजात भांडण लावले. आता ओबीसींमध्ये वाद लावण्याचे काम ते करीत आहेत. मात्र, ओबीसी समाज शरद पवार यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. खरे तर शरद पवार यांची मंडल यात्रा म्हणजे नौटंकी आणि फुसका बार आहे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे केली.
अमरावतीत एका कार्यक्रमासाठी आले असताना बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी नागपुरातून मंडल यात्रेला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सत्तेत असले की ओबीसीला विचारायचे नाही आणि सत्ता गेली की ओबीसींचा पुळका आणायचा, ही पवार यांची जुनी राजकीय खेळी आहे.
केंद्र व राज्यात त्यांनी सत्तेत अनेक महत्त्वाची पदे भूषविली. परंतु ओबीसीला कधीही न्याय दिला नाही. जातनिहाय जनगणना केली नाही. ओबीसीला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय दिला. ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू केले. सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आरक्षणाची लढाई लढली.
त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये १३ हजार पदांवर ओबीसींना न्याय मिळेल. राज्यात ओबीसी महामंडळांना संवैधानिक दर्जा दिला. १८ महामंडळे वेगवेगळ्या समाजाला दिलेत. असे एक ना अनेक निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले आहेत. त्यामुळे ओबीसी समाज शरद पवार यांच्या मंडल यात्रेच्या नौटंकीला बळी पडणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार
- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतदार यादी आताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बघून घ्यावी. आताच ऑब्जेक्शन घेऊन टाका नाही तर उद्या हरल्यावर पुन्हा म्हणतील मतदार याद्या चुकीच्या होत्या.
- ऑब्जेक्शन घ्या, आम्ही ५१ टक्के मतांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकणार आहोत. आणि राहुल गांधींच्या गुडबुकमध्ये येण्याकरिता यशोमती ठाकूर व विजय वडेट्टीवार बोलत आहेत.
- राहुल गांधींना या देशाची व विकासाची नाळ कळली नाही. पवित्र निवडणूक आयोगाच्या कामावरती ते आक्षेप घेतात, असे बावनकुळे म्हणाले.