अप्पर वर्धा लगतची ७० गावे तहानलेलीच, शहरालाही दिवसआड पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST2020-03-22T06:00:00+5:302020-03-22T06:00:21+5:30
जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे.

अप्पर वर्धा लगतची ७० गावे तहानलेलीच, शहरालाही दिवसआड पुरवठा
जितेंद्र दखने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साडेआठ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहरासह वरूड, मोर्शी तालुक्यांची तहान भागविणाऱ्या अप्पर वर्धा धरणालगतची ७० गावे मात्र अद्यापही पाण्यासाठी आसुसलेली आहेत.
जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहराला एक दिवसाआड पाणी होत आहे. मोर्शी शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी तालुक्यातील ७० गावे पाणीपुरवठा योजना वीज देयकाअभावी रखडली. ५५ किलोमीटर अंतरावरील अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया पाइप लाइनशेजारी सुमारे १०८ गावे आहेत. त्यांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पेयजलाचे वितरण केले जाते. मात्र, त्यातील लोणी, जरूड व हिवरखेड पाणीपुरवठा योजनेला मर्यादा आहेत. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील लेहगाव, काटपूर, सावरखेड, वाघोली, शिरखेड या व लगतच्या ६० गावांना अधिग्रहीत विहिरी व टँकरवर अवलंबून राहावे लागते.
अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मोर्शी ते अमरावती अशी पाइप लाइन टाकण्यात आली आहे. त्यातून १० टक्के, तर ग्रामीण भागात पाच टक्के अशी पाणीगळती होत असल्याची माहिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी दिली.
शासनाच्या दुर्लक्षामुळे काही वर्षांपासून ७० गाव पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना उन्हाळ्यासोबतच आताही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेमधून तहान भागविली जाते. पाणीप्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे.
- शरद मोहोड
जिल्हा परिषद सदस्य
हिवरखेड या ११ गावे पाणीपुरवठा योजनेत जामगाव, बारगाव, खडकासह अन्य गावांचा समावेश होता. अनियमित पाणीपुरवठा व पाणीपट्टी परवडत नसल्याने हिवरखेड वगळता अन्य दहा गावे लाभ घेत नाहीत. पाक प्रकल्पातून या गावांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
- श्रीधर सोलव
माजी झेडपी सदस्य
१६ गावे पाणीपुरवठा योजना सध्या बंद आहे. यामुळे लोणी-जरूड या गावांची स्वतंत्र व पर्यायी व्यवस्थेतून तहान भागविली जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरूपी पाण्याची सोई होणे गरजेचे आहे.
- नितीन टेंभे, सरपंच, लोणी तथा अध्यक्ष, पाणीपुरवठा योजना