शहरात सात फिडरचे होणार खासगीकरण
By Admin | Updated: April 27, 2015 00:01 IST2015-04-27T00:01:09+5:302015-04-27T00:01:09+5:30
वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. ..

शहरात सात फिडरचे होणार खासगीकरण
वीज गळती रोखणार : वीजचोरी रोखण्यासाठी खासगी व्यवस्थापक
अमरावती : वीजचोरी, गळती रोखण्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवे धोरण आखले आहे. त्यानुसार अमरावतीत सात फिडरचे खासगीकरण होणार असून वीजचोरी आणि गळती रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. नवीन धोरणामुळे वीजचोरट्यांवर अंकुश लावण्याच्या दृष्टीने कठोर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजचोरी, गळतीवर उपाययोजना करण्यासाठी वीज पारेषण, वीज वितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली. थकीत देयकांबाबत यावेळी चिंंता व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यात ऊर्जा खात्याला फारशे यश मिळाले नसल्याचे शल्यदेखील त्यांनी व्यक्त केले. संपूर्ण राज्यातील वीजचोरी, गळतीच्या अहवालाची आकडेवारी घेत असताना अमरावतीत सात फिडरवरील वीजचोरी आणि गळती रोखण्यात दोन वर्षांपासून अपयश येत असल्याचे ना. बावनकुळे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वीजचोरी, गळतीचे धोरण आखताना अमरावती येथील सातही फिडरचे व्यवस्थापनाचे काम खासगी व्यवस्थापनाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या सातही फिडरवर सुरू असलेली वीजचोरी, गळती रोखण्याची जबाबदारी शासन खासगी व्यवस्थापनाकडे सोपविणार आहे.
या सात फिडरवर नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यासाठी निविदा मागविल्या असून तशी जाहिरात देखील प्रसिध्द झाली आहे. बेरोजगार संस्थांना फिडरच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथील मुस्लिमबहुल भागात वीज देयकापोटी कोट्यवधी रुपये थकीत आहेत. वारंवार नोटीस अथवा सूचना देऊनही या भागातील ग्राहक देयके अदा करीत नसल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काही अधिकाऱ्यांच्या मते शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण वीजचोरी आणि गळती होणाऱ्या भागात कर्तव्य बजावणे धोक्याचे ठरते तर फिडरची जबाबदारी खासगी व्यक्तींकडे सोपविणे म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचा डाव असल्याची शंका काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शहराच्या पश्चिमेकडील भागातील रहिवाशांवर खासगी वीज सेवा घेण्याचा प्रसंग लवकरच ओढवणार असल्याची चिन्हे आहेत. भाजीबाजार व कडबीबाजारातील दोन केंद्रांवर आतापर्यंत एक कोटी रुपयांचे वीज देयक थकीत असल्याची माहिती आहे. वीज वितरण कंपनीत मनुष्यबळाचा अभाव ही नित्याचीच बाब असून ग्राहकांच्या तक्रारी, देखभाल, दुरुस्ती आणि देयकांच्या वसुलीची कामे अधिकाऱ्यांना करावी लागत आहेत.
या सात फिडरचे
होणार खासगीकरण
वीजचोरी, गळतीचे प्रमाण रोखण्यात शहरातील सात फिडरला अपयश आले आहे. या फिडरचे नियंत्रण आता खासगी व्यवस्थापनाकडे सोपविले जाणार आहे. यात चित्रा, ताज, नवसारी, भाजीबाजार, न्यू ताज, पाटीपुरा व लोणटेक या फिडर्सचा समावेश राहणार आहे. हल्ली ही प्रक्रिया निविदा स्वरुपात असली तरी याबाबत शासनादेश आल्याची माहिती आहे. त्यामुळे वीज चारट्यांना वठणीवर आणण्यासाठी शासनाने खासगीकरणाची वााट शोधली असल्याचे दिसून येते.
शासनाने वीजचोरी, गळती रोखण्यासाठी धोरण ठरविले आहे. अद्याप शासन निर्णयाची प्रत पोहोचली नाही. मात्र, याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली आहेत. फिडरनिहाय खासगी व्यवस्थापकाची नियुक्ती करुन वीजचोरी पकडणे, देयकांची वसुली आणि दर्शनी भागात वीज मीटर बसविण्याची जबाबदारी दिली जाईल. हा सर्व प्रकार लोकसहभागातून केला जाणार आहे.
- दिलीप घुगल,
अधीक्षक अभियंता,
वीज वितरण कंपनी.