भूकंपाची धास्ती, मदतीचे हातही!

By Admin | Updated: April 28, 2015 00:17 IST2015-04-28T00:17:35+5:302015-04-28T00:17:35+5:30

नेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे.

Seismic exposure, hand in hand! | भूकंपाची धास्ती, मदतीचे हातही!

भूकंपाची धास्ती, मदतीचे हातही!

अनेक ठिकाणी जाणवली कंपणे : चर्चांना ऊत, निसर्गाचा प्रकोप भोवणार काय?, आपात्कालिन यंत्रणा सज्ज
लोकमत विशेष
वैभव बाबरेकर अमरावती
नेपाळसह देशातही भूकंपाचे धक्के बसल्याने अमरावतीत भितीची लकेर उमटली आहे. जिल्ह्याच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वृत्त वाहिन्या व वृत्तपत्रांमधून मिळणारी माहिती नागरिक जाणून घेत आहेत. भूकंपाचा अनुभव घेताना अमरावतीकरांनी माणुसकीचा परिचयदेखील दिला आहे. नेपाळच्या दिश्ेने मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
शनिवारी झालेल्या भूकंपाची उर्ध्ववर्धा धरणावरील भूकंपमापक यंत्रावर नोंद करण्यात आली. त्यामध्ये रिस्टर स्केलवर ५.५ आणि ५.१ इतकी नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परतवाडा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी तसेच अमरावती शहरातही भूकंपाचा अनुभव नागरिकांनी घेतला. नेपाळ येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्यामुळे तेथे सर्वाधिक प्राणहानी व आर्थिक हानी झाली. रविवारी नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के बसले.
भूगर्भात सातत्याने हालचाली होत असतात. मात्र, त्यांची तीव्रता अधिक असल्यास भूकंपाचे धक्के जाणवतात, असे भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यालगतच भूकंपाचे धक्के जाणवल्याने आता अमरावतीकरही प्रचंड धास्तावले आहेत. निसर्गाच्या प्रकोपाचा सामना आपल्यालाही तर करावा लागणार नाही ना, असा सवाल आहे. अशाही स्थितीती अमरावतीहून नेपाळसाठी वैद्यकीय तज्ज्ञांची चमू रवाना करण्यात आली.

जिल्ह्यात ५० जणांचे
शोध व बचाव पथक
जिल्ह्यात ५० शासकीय कर्मचाऱ्यांचे शोध व बचाव पथक तैनात आहे. त्यांना आग, वीज, भूकंप या विषयाचे आपात्कालिन प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये शहर व ग्रामीण पोलीस, एसआरपीएफ, होमगार्ड, एनजीओ, वैद्यकीय सेवा पथक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्थ सर्व विभागांचे पथक तयार आहे.

वाशिम येथील
१५० नागरिक सुरक्षित
वाशिम जिल्ह्यातील १५० पर्यटक नेपाळला गेले होते. ते सर्व सुरक्षित आहेत. सध्या ते नेपाळ येथील लुंबिनी येथे आहेत. अकोला येथे देशमुख नामक पर्यटक काठमांडूला आहे. सोमवारी ते विमानाने पोहोचणार आहेत. अन्य जिल्हे निरंक असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

अमरावतीचे १६ पर्यटक
अयोध्या येथे दाखल
नेपाळमधील भूकंपामुळे अमरावतीचे ३० पर्यटक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अमरावतीमधील १६ पर्यटक काठमांडू येथे गेले होते. ते परतीच्या प्रवासात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शहरातील शिलाबेन पोपट यांचे कुटुंबीय नेपाळ येथील काठमांडू येथे गेले होते. गोरखपूरमार्गे भारतात अयोध्या येथे सोमवारी ते दाखल झालेत. ३ मे रोजी ते अमरावतीत दाखल होतील.

भूकंपाचे धक्के
जाणवल्यास काय कराल?
भूकंपाच्या धक्क्यांपासून संरक्षणासाठी सर्वात आधी इमारतीचा पाया मजबूत ठेवणे आवश्यक आहे. कंपणे जाणवल्यास सर्वप्रथम घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या मैदानात जावे, तत्काळ आपात्कालिन शासकीय विभागाशी संपर्क करावा.

भूकंपातील मृतांना झेडपीत श्रध्दांजली
नेपाळसह देशातील उत्तरप्रदेश व बिहार येथे झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे सभापती व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळले.

भारताच्या नैसर्गिक स्थितीवरून चार झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये ३८ शहरे हायरिस्कमध्ये येतात. अमरावती दुसऱ्या व तिसऱ्या झोनमध्ये असून धोका कमी आहे. मात्र सौम्य धक्याने हानी होऊ नये, यासाठी इमारतींचा पाया मजबूत करावा.
-सैय्यद फजल रहेमान खादरी,
भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख, अमरावती विद्यापीठ

सर्व ट्रॅव्हल्स कंपन्यांशी चर्चा केली असता शहरातील कोणीही नेपाळमध्ये नसल्याची माहिती आहे. खासगीरीत्या १६ जण काठमांडूला गेले होते. त्यांच्याशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली. ते सुखरुप असून रविवारी परतीच्या प्रवासाला निघाले होते. सोमवारपर्यंत ते अमरावतीत पोहोचणार आहेत.
-मोहन पातुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Seismic exposure, hand in hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.