अमरावती जिल्ह्यात दुसरी लाट घातक, ७० हजार ४६९ पॉझिटिव्ह, १०४३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:18 IST2021-06-02T11:18:16+5:302021-06-02T11:18:35+5:30
Amravati News अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारला आहे.

अमरावती जिल्ह्यात दुसरी लाट घातक, ७० हजार ४६९ पॉझिटिव्ह, १०४३ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारला आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत तब्बल ७०,४६९ पॉझिटिव्ह रुग्ण व १,०४३ संक्रमितांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांच्या संख्येमुळे लाट जिल्ह्यासाठी घातक ठरली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी ६९०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३३८ पॉझिटिव्हची नोंद झाली. संक्रमणाची ही यंदाची नीचांकी ४.८९ टक्केवारी आहे. तसे पाहता, पाच दिवसांपासून पॉझिटिव्हिटी घटल्याने जिल्हा रेड झोनमधून बाहेर पडला व कठोर संचारबंदीमध्ये िशिथिलता देण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावती जिल्ह्यापासून झाली. फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. अन्य जिल्ह्यात लाट ओसरली असली तरी जिल्ह्यात मात्र संसर्गाचा आलेख वाढताच होता. अखेर जिल्हा प्रशासनाने कठोर संचारबंदी लावली व त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसायला लागले आहेत.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात महापालिका क्षेत्रात संसर्ग वाढला होता व एप्रिलमध्ये शहरातला संसर्ग माघारला. त्यानंतर तो ग्रामीण भागात वाढीस लागला. वरूड, मोर्शी, अचलपूर, धारणी, अंजनगाव सुर्जी आदी तालुके कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ ठरले. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने होम आयसोलेशन, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर जोर दिल्यानंतर आता कुठे संसर्ग घटला आहे.
जिल्ह्यात ६५,२४० संक्रमणमुक्त
जिल्ह्यात १ फेब्रुवारीला २१,२१७ व १ जूनला ८६,४५७ अशी संक्रमणमुक्तांची संख्या आहे. म्हणजेच यादरम्यान आलेल्या ६५,२४० नागरिक संक्रमणमुक्त झाले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले व तपासणी पथके तसेच ग्राम दक्षता समित्या सक्रिय करण्यात आल्याचा हा परिणाम आहे.