अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’
By गणेश वासनिक | Updated: July 24, 2023 20:01 IST2023-07-24T20:00:46+5:302023-07-24T20:01:02+5:30
अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे.

अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’
अमरावती : येथील प्राचीन अंबादेवी मंदिर परिसरातील एका चित्रावरून एक अत्यंत वेधक शाेध लागला आहे. या चित्रगुहेच्या दगडी भिंतीवरील चित्रात एक सात पाकळ्यांचे कमळ स्वतंत्रपणे कोरले गेले आहे. विशेष म्हणजे यातील प्रत्येक पाकळी योनीच्या स्वरूपात आहे. ज्यामध्ये चार पाकळ्या वरच्या दिशेने आणि तीन पाकळ्या खालच्या दिशेने दिसत आहेत. या अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे.
डॉ. विजय इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या सहा निसर्ग संशोधकांनी मोर्शीपासून अवघ्या ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत २००७ साली जवळपास ३५ हजार वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. ही बाब सर्वश्रुत आहे. या चित्रांचे अद्यापही या चमूव्दारे संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.
योनीस्वरूप पाकळ्यांनी कोरलेल्या कमळाचा हा शोध अनेक गहन प्रश्न निर्माण करतो. याचे कारण म्हणजे योनी प्रजनन दर्शवते. यात ठळकपणे सात पाकळ्यांचे कमळ आहे, ज्याला सप्तपदी कमळ किंवा सात पायऱ्यांचे कमळ म्हणून ओळखले जाते. ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक पाकळीचा मूळ आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुध्द चक्र, अजना चक्र म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, विवेक आणि समाधी आहे. कमळ हे पावित्र्य, देवत्व, आत्मज्ञान आणि सृष्टीच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करणारे एक आदरयुक्त प्रतीक आहे.
हिंदू पौराणिक कथा, विधी आणि प्रतिमा शास्त्रातील त्याची उपस्थिती हिंदू संस्कृतीच्या धार्माक आणि आध्यात्मिक सारामध्ये त्याची अविभाज्य भूमिका अधोरेखित करते. त्याचे अंदाजे वय संभाव्यतः ४००० इस. पूर्व वैदिक काळाशी जोडलेले असावे. उल्लेखनीय शैला, स्त्रीत्व आणि निर्मितीच्या प्रतीकांसह त्याचा संबंध ती एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्व कलाकृती म्हणून स्थापित करते. या गूढ शोधाच्या सभोवतालचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विस्तृत तपासणी आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरेल. पुरातत्त्व भाषाशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासातील तज्ज्ञ या अनोख्या प्रतिनिधित्वामागील अर्थ आणि महत्त्व उलगडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. संशोधक डॉ. विजय इंगोले यावर एक संशोधन पेपरही तयार करीत आहेत. निसर्ग संशोधकांच्या चमूतील इतर वन्यजीव सदस्यांचे या संशोधनात महत्वपूर्ण योगदान आहे.