रेती तस्करीमुळे शेतीचे बांध खचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:48+5:30
संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या रेती तस्करांची प्रशासनात मिलीभगत असल्यामुळे एवढे निर्ढावले आहेत की, २५ खबऱ्यांची टोळी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी आणि ५०-६० मजूर नदीचे पात्र खोदण्यासाठी वापरले जातात. पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताफा ही रेती वाहून नेण्यासाठी वापरला जातो. एवढी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.

रेती तस्करीमुळे शेतीचे बांध खचले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : सातपुड्यातून वाहत येणाऱ्या वर्णी नदीच्या काठावर असलेल्या मौजा लखाड येथील शेतीचे काठ रेती तस्करांकडून होत असलेल्या बेसुमार उपशामुळे ठिकठिकाणी खचले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. रेती तस्करांच्या संघटित गुन्हेगारीमुळे शेतकरी त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास धजावत नाहीत. तथापि, स्वप्निल आखरे या शेतकऱ्याने पुराव्यांसह तक्रार महसूल व पोलीस प्रशासन आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
संघटित गुन्हेगारी करणाऱ्या या रेती तस्करांची प्रशासनात मिलीभगत असल्यामुळे एवढे निर्ढावले आहेत की, २५ खबऱ्यांची टोळी रात्रीच्या वेळी नजर ठेवण्यासाठी आणि ५०-६० मजूर नदीचे पात्र खोदण्यासाठी वापरले जातात. पाच ते दहा ट्रॅक्टर-ट्रॉलीचा ताफा ही रेती वाहून नेण्यासाठी वापरला जातो. एवढी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत असताना प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे.
तक्रारींचा ओघ वाढला की, दाखविण्यापुरता एखादा ट्रॅक्टर जप्त करून थातूरमातूर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, या रेती चोरीमुळे नदीचे पात्र आणि दोन्ही काठ खरडून निघाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खोल नदीपात्रात कोसळून पडत आहेत. लखाड येथील नदीपात्रात धुमाकूळ घालणारे रेती तस्कर शेताच्या नुकसानास जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.