जुन्या पिंपांमधून खाद्यतेलाची विक्री
By Admin | Updated: January 5, 2017 00:17 IST2017-01-05T00:17:44+5:302017-01-05T00:17:44+5:30
जुन्या, कालबाह्य झालेल्या व अनेकदा वापरलेल्या डब्यांमधूनच खाद्यतेलाची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

जुन्या पिंपांमधून खाद्यतेलाची विक्री
नागरिकांच्या जीवाला धोका : अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
जुन्या, कालबाह्य झालेल्या व अनेकदा वापरलेल्या डब्यांमधूनच खाद्यतेलाची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. गंजलेल्या डब्यातून खाद्यतेल ग्राहकांपर्यंत पोहोचते. त्याचे आहारातून सेवन होते. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
याकडे अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खाद्यतेलाची जुन्या डब्यातून विक्री करणे हा अन्न सुरक्षा मानदे कायदेनुसार गुन्हा ठरतो. परंतु तरीही काही लोकांनी हा व्यापार थाटला आहे. अंबानगरीत खुल्या डब्यातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. मोठ्या ड्रममधून तेल आणून किरकोळ व्यवसायिकांना व ग्राहकांना या तेलाची विक्री केली जाते. इतवारा बाजारात याचा व्यापार मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. याच ठिकाणी जुने पिंप ( डब्बे) विकण्याचा व्यापार चालतो. काही पिंपांना जंग लागलेला असतो. वारंवार याच डब्यातून तेलाची विक्री केली जाते. पिंपामधील घाण व जंग तेलात मिसळून ते नागरिकांच्या पोटात गेले तर पोटाचे आजार तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार देखील बळावू शकतात. यातून अनेकांना आजारांची बाधा झाल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. अन्न सुरक्षा मानदे कायदेनुसार नवीन व स्वच्छ डब्यातूनच तेलाची विक्री व्हायला हवी. असा नियम आहे. पण, नवीन डब्यातून तेलविक्री करणे हे महागात पडते. थोड्या नफ्यासाठी असा प्रकार करणारे व्यापारी नागरिकांच्या जिविताशी खेळत आहेत. याकडे अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.याप्रकरणात यावर्षी मोजक्याच कारवाई झाल्याचे निदर्शनास आले आहे
कवडीमोल भावात मिळतो रिकामा डबा
नागरिकांनी वापरलेले खाद्यतेलाचे जुने डब गोळा करण्यात येतात व ते वॉशिंग पावडरने धुतले जातात. नंतर ते दुकानदारांना विकले जातात. तेलाचा रिकामा डबा एकदा वापरला असेल तर त्याला २० ते२५ रुपये किंमत मिळते. जर वारंवार वापरला असेल तर १६ ते २० रुपयांना हा डबा काही भंगारवाले किरकोळ किराणा दुकानदारांना विकतात. शहरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. खाद्यतेलाचे जुने डबे वापरणे हे गैर आहे. नागरिकांनी या जुन्या वापरलेल्या डब्यातील खाद्यतेल विकत घेऊन ते आहारात वापरल्यास ते आरोग्याला हानिकारक ठरु शकते. त्यामुळे अशा प्रकारावर कायमस्वरूपी अंकुश लावण्याची गरज आहे.
आम्ही याप्रकाराची माहिती घेऊन जुन्या डब्यातून खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासंदर्भाचे आदेश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
- एस.आर. केकरे
सह. आयुक्त अन्न प्रशासन विभाग अमरावती.
अशा डब्यात फंगस निर्माण होऊ शकतोे. त्यामुळे फुड पॉयझन होऊन उलट्या व पोटाचे आजार होऊ शकतात.त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असते.
- मनोज निचत
हदयरोग तज्ज्ञ, अमरावती.