निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:02 IST2019-03-25T21:01:22+5:302019-03-25T21:02:54+5:30
बापाविरुद्ध कशी द्यावी तक्रार? : मुलाचा सवाल, प्राणांतिक वेदनेतही संवेदना जागृत; होळीला पाच जणांचे मद्यधुंद अवस्थेत कृत्य

निर्दयी बाप! ‘त्या’ घटनेत आणखी एका अल्पवयीन मुलाला झाऱ्याने चटके
बडनेरा (अमरावती) : जुनी वस्तीतील एका ठिकाणी होळीच्या रात्री खोलीत डांबून नातेवाइकांनी गरम झाऱ्याचे चटके दिल्याचे उघड झाले. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, एकाच मुलाची तक्रार बडनेरा ठाण्यापर्यंत पोहोचली. मात्र, दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा बापच चटके देणाऱ्यांमध्ये असल्याने प्राणांतिक वेदना सहन करूनही त्याने बापाविरुद्ध तक्रार दिली नाही. त्यामुळे मानवाधिकार विभागासह बाल अत्याचार प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या शासकीय विभाग व सामाजिक संस्थांनी या प्रकरणाची दखल घेणे अपेक्षित आहे.
बडनेरा जुनी वस्तीत दोन अल्पवयीन बालकांना खोलीत डांबून त्यांचेच नातेवाइक असलेल्या पाच जणांनी गरम झाऱ्याने चटके दिले. शरीराची त्वचा पांढरी होईपर्यंत त्यांचे मांस सोलपटले. त्यामधील हिमांशू नामक बालकाच्या आईने मातृत्वापोटी तक्रार केल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तत्काळ दखल घेत गुन्हा नोंदविला आणि आरोपींना अटक केली. मात्र, दुसऱ्या बालकाकडून तक्रार गेली नाही. कारण मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य करणाऱ्यांमध्ये त्याचा बापच होता. बडनेरा पोलिसांनी या मुलाचेही बयाण नोंदविले. मात्र, तक्रार न दिल्याने पोलिसांनी पुढील कार्यवाही केली नाही. वास्तविक, या अमानुष प्रकाराबाबत पोलिसांनी ‘स्यू मोटो (स्वत:हून)’ कारवाई करायला हवी होती. हा प्रकार मानवाधिकाराचे हनन आहे. त्यामुळे मानवाधिकार विभागासह बालअत्याचार प्रतिबंधासाठी काम करणाºया शासकीय विभाग व सामाजिक संस्थांनाही दखल घेणे अपेक्षित आहे.
काय घडले २१ मार्च रोजी?
उमरेड येथील वंदना उके मुलगा हिमांशुसोबत होळीच्या सुट्यांमध्ये बडनेरा जुनीवस्तीतील भावाकडे आल्या होत्या. त्याचा अल्पवयीन मुलगा बारावीत शिकतो. त्याला शिकविण्याच्या उद्देशानेच वंदना उके यांनी मुक्काम केला. दरम्यान, होळीला २१ मार्चच्या रात्री ११ वाजता हिमांशू व अल्पवयीन मुलगा कैलास राऊतच्या घरासमोरून जात होते. या दुमजली घराच्या वरच्या माळ्यावर पाचही आरोपी दारू पीत होते. त्यांनी हिमांशू व दुसºया अल्पवयीनाला बोलाविले. जबरीने दारू पाजली. ते बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी दोन्ही मुलांना गरम झाºयाचे चटके दिले. दरम्यानच्या काळात तेथे महिलांसोबत बसलेल्या वंदना उके यांनी वर जाऊन पाहिले असता, त्यांना धक्काच बसला. स्वत:च्या भावासोबत पाच जण चटके देत असल्याचे त्यांना दिसले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मुलांना सोडविले आणि हिमांशूला खासगी रुग्णालयात उपचार करून थेट उमरेड गाठले. त्यानंतर २३ मार्च रोजी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दरम्यान, आरोपींनी दारूच्या नशेत हे गैरकृत्य केल्याची कबुली पोलीस कोठडीदरम्यान दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुलांना खाली फेकण्याची होती तयारी
कैलास राऊत यांच्यावरच्या मजल्यावरून दोन्ही मुलांना आरोपी खाली फेकणार होते. त्याचवेळी वंदना उके धावून गेल्या. त्यामुळे दोघेही मोठ्या दुखापतीतून बचावले. दारूच्या नशेत आरोपींनी हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. दुसºया मुलाची चौकशी करून त्याच्यासोबत काय घडले, याची शहानिशा करून, त्यांनी फिर्याद दिल्यास दुसरा गुन्हा दाखल करू.
यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त