मुंबई, पुण्याकडील आरटीओ अधिकाऱ्यांचा विदर्भात रूजू होण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 22:36 IST2025-07-11T22:36:02+5:302025-07-11T22:36:47+5:30
अमरावती, नागपूर विभागात सारखीच स्थिती; बदली नियमबाह्य झाल्याप्रकरणी ‘मॅट’मध्ये निकाल प्रलंबित

मुंबई, पुण्याकडील आरटीओ अधिकाऱ्यांचा विदर्भात रूजू होण्यास नकार
अमरावती : राज्याच्या परिवहन खात्याने प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक अशा विविध अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यापैकी बहुतांश अधिकारी विदर्भात रुज़ू झाले नाहीत, तर काहींनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)मध्ये न्यायासाठी धाव घेतली आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर विभागातून आरटीओ अधिकाऱ्यांची विदर्भात कर्तव्य बजावण्यात नकारघंटा असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसूल वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
परिवहन खात्याने मे २०२५ मध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक यांचा प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. असे असताना विदर्भातील नागपूर व अमरावती विभागांत आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. नागपूर वगळता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत आरटीओत सहायक मोटार वाहन निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षकांची ३५ टक्के समप्रमाणात पदे रिक्त आहेत. अमरावती विभागात हीच स्थिती आहे. एक अधिकारी दोन ते तीन ठिकाणचा कारभार हाताळत आहे. विदर्भात आर्थिक मागासलेपण आणि उद्याेगधंद्यांचा अभाव हे देखील आरटीओ अधिकारी येथे येण्यास नकार देत असल्याचे वास्तव आहे.
सहायक वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीची फाईल कुठे?
परिवहन खात्याचा कारभार कासवगतीने सुरू आहे. राज्यभरात आरटीओत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वानवा असताना गत काही महिन्यांपासून ३३० सहायक वाहन निरीक्षकांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सहायक वाहन निरीक्षक हे पदोन्नतीने मोटार वाहन निरीक्षक होतील. मात्र, मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयात ही फाईल कोणी थांबवली? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या परिवहन खात्यात नेमके काय सुरू आहे, हे अधिकाऱ्यांना सुद्धा कळू शकत नाही. पदोन्नती रखडल्याने काही पदांवर नियुक्तीची प्रतीक्षा आहे.
अमरावती विभागात ३७ अधिकाऱ्यांची पदे रिक्त
अमरावती विभागात आरटीओत तब्बल ३७ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यात अमरावती १०, बुलढाणा ५, अकोला १०, वाशिम ५ तर यवतमाळ येथे ७ अशी अधिकाऱ्यांची गरज आहे. यवतमाळचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख हे अमरावतीचा कारभार सांभाळत आहेत. चार दिवस यवतमाळ तर दोन दिवस अमरावती अशी त्यांची कसरत होत आहे. तर अमरावती येथे एका मोटार वाहन निरीक्षकाकडे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचा प्रभार सोपवला आहे.