नदीपुलाचा सुधारित सहा कोटींचा प्रस्ताव दाखल !
By Admin | Updated: March 31, 2017 00:18 IST2017-03-31T00:18:55+5:302017-03-31T00:18:55+5:30
बनोसा-बाभळीला जोडणारा चंद्रभागा नदीवरील लहान पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नदीपुलाचा सुधारित सहा कोटींचा प्रस्ताव दाखल !
धोकादायी : मंजुरी मिळाल्यास अपघात टळणार
दर्यापूर : बनोसा-बाभळीला जोडणारा चंद्रभागा नदीवरील लहान पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ६ कोटींचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्या पुलाची मंजुरी मिळवून लांबी रुंदी व उंची वाढविल्यास संभाव्य अपघात टळू शकतील.
३० ते ३५ वर्षात या पुलाखाली अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहे. अंदाजे ३५ ते ४० जणांचे प्राण या पुलावरुन खाली पडून गेले आहे. त्यामुळे बाभळीवासियांची तो पुल मोठा करण्याची अनेक वर्र्षींची मागणी आहे. हा प्रश्न "लोकमत"नेही लोकदरबारात मांडला आहे. आ. प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आमदार रमेश बुदिंले याच्यामार्फत त्या पुलाचा नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. यापूर्वी ५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. पण आता या पुलाची सुधारित किंमत वाढली आहे. ६ कोटींचा प्रस्ताव नव्याने तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. या पुलांची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अल्प पावसामुळेही पुलावरून पाणी वाहते. बाभळी व बनोस्याला जोेडणारा हा जवळचा मार्ग असल्याने या पुलावरून पाणी असतानाही जीव धोक्यात टाकून नागरिकांची ये-जा सुरु असते. त्यामुळे अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहे. या पुलाच्याजवळ मोठा डोह असून या डोहात कुणी पडले तर त्याला आपला जीव गमवावा लागतो. या ठिकाणी उन्हाळयातही पाणी साचलेले राहते. त्यामुळे येथे मोठ्या कपारी पडल्याची माहिती काही जाणकार देतात. त्यामुळे हा पूल तोडून मोठा पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे. ( तालुका प्रतिनिधी)