खाद्यपदार्थ तळण्याकरिता तेलाचा सर्रास पुनर्वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:49 IST2019-03-12T22:49:26+5:302019-03-12T22:49:53+5:30
एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याची बाब सर्वत्र पाहावयास मिळते. हा नागरिकांच्या जीविताशी खेळच आहे. अन्न प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याने नव्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची बाब पुढे आली आहे.

खाद्यपदार्थ तळण्याकरिता तेलाचा सर्रास पुनर्वापर
संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एकदा कढईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केला जात असल्याची बाब सर्वत्र पाहावयास मिळते. हा नागरिकांच्या जीविताशी खेळच आहे. अन्न प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्याने नव्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची बाब पुढे आली आहे.
अमरावती शहरातील चौकाचौकांमध्ये फास्ट फूड व जंक फूडचे स्टॉल लागलेले आहेत. त्यांच्यासह हॉटेल, रेस्टाँरेंट आणि फेरीवाल्यांकडे खाद्यपदार्थ तयार करताना तेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो. एकदा तळणासाठी घातलेले तेल वारंवार वापरणे आरोग्याकरिता हानिकारक असल्याने १ मार्चपासून शासनाने जळालेल्या तेलाच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून सदर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा हॉटेलमध्ये वारंवार खाद्यपदार्थ तळण्याकरिता त्याच त्या तेलाचा वापर नियमबाह्य ठरतो. त्याअनुषंगाने कारवाया अपेक्षित आहे. पण, गेल्या वर्षभरात यासंदर्भाची मोहीम अन्न प्रशासन विभागाने राबविली नसल्याची बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त लहान-मोठे हॉटेल व खाद्यपदार्थांचे रेस्टॉरेंट आहेत तसेच हजारो हातगाड्यांवर खाद्यपदार्थ तयार केले जातात. पुनर्वापर केलेल्या तेलाने तळलेले खाद्यपदार्थ सेवन करणे, आरोग्याकरिता अतिशय हानिकारक असून, यासंदर्भाचा कायदेशीर नियम लागू झाला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशही शासनाने अन्न व प्रशासन विभागाला दिले आहेत. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याने हा प्रकार जोमाने सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
हॉटेलांना ठेवाव्या लागणार नोंदी
खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर आरोग्यासाठी घातक आहे. एक किंवा दोनदा वापरल्यावर जळालेल्या तेलात ट्रान्सफॅट ( घातक मेद, चरबी) मोठ्या प्रमाणांत तयार होते. त्याचे सातत्याने सेवन केल्यास हृदयविकार तसेच मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका बळावतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी आॅफ इंडियाच्या सूचनेवरून सरकारने १ मार्च २०१९ पासून खाद्यतेलाच्या पुनर्वापराबाबत नवे नियम लागू केले आहेत. हॉटेल वा रेस्टॉरेंटमध्ये यापुढे खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेलाचा पुनर्वापर करता येणार नाही. दिवसाला ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेलाच्या वापर करणारे हॉटेल तेलाच्या वापराचे रेकॉर्ड ठेवतील. खाद्यतेलाची खरेदी, त्याचा किती प्रमाणात वापर केला, वापरलेले तेल पुन्हा तळणासाठी घेतले आहे का, यासंदर्भातील माहिती ठेवावी लागणार आहे. ५० लिटरपेक्षा कमी प्रमाणात तेलाचा वापर करणाऱ्यांना नोंदी ठेवणे बंधनकारक नसले तरी निर्देशांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहणार आहे.
पुनर्वापर तीन वेळापेक्षा जास्त नको
तेलाचा पुनर्वापर वारंवार झाल्यास पॉलिमरायझेशन प्रक्रिया होऊन तेलातील पोलर कंम्पाऊंडचे प्रमाण वाढते. तेलात हे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा अधिक नको, असा हा नवीन नियम आहे.
तेलाचा पुनर्वापर केला जात असेल, तर कारवाई केली जाईल. यासंदर्भात नेमके काय दिशानिर्देश आहेत, हेदेखील तपासले जाणार आहे.
- सचिन केदारे
सहायक आयुक्त, अन्न (अमरावती)
तेलाचा पुनर्वापर होत असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते. असे पदार्थ नियमित खाल्ल्याने पोटाचे विकारसुद्धा बळावतात.
- मनोज निचत,
हृदय व मधुमेह विकार तज्ज्ञ, अमरावती