शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर जेलमध्ये टाकले जाते, मुख्यमंत्र्यांवर टीका
सूरज दाहाट - तिवसा : स्थानिक दिवाणी व फौजदारी न्यायालयात आमदार रवि राणा यांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता आंदोलनप्रकरणी सुनावणीसाठी हजेरी लावली. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले तर तुरुंगात टाकले जाते, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही टीका होती.
शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे, या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवि राणा यांनी तिवसा तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीसमोर रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यांच्यासह २० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी जामीन नाकारून चार दिवसांचा तुरुंगवास त्यांनी पत्करला होता. तिवसा न्यायालयात सुनावणीनंतर त्यांनी तिवसा येथे ‘लोकमत’शी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढलो, तर आमदारासह शेतकऱ्यांना कारागृहात डांबले जाते, असा आरोप त्यांनी केला. यावेळी युवा स्वाभिमानचे धीरज केने, जितू दुधाने, संदेश मेश्राम, तुषार राऊतकर, अश्विन उके आदी उपस्थित होते. न्यायालयाच्या प्रकरणात ॲड. आशिष लांडे हे कामकाज पाहत आहेत.
बॉक्स
राज्यात राष्ट्रपती शासन हवे
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागले पाहिजे. शिवसेना गुंडागिरी करीत आहे. नारायण राणे यांची अटक चुकीची आहे. त्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक आरोपीसारखी आहे, असेही रवि राणा म्हणाले.