आरसीसी पिलरमध्ये अपहार
By Admin | Updated: January 4, 2017 00:22 IST2017-01-04T00:22:00+5:302017-01-04T00:22:00+5:30
वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची ...

आरसीसी पिलरमध्ये अपहार
निविदाविनाच कामे : वडाळी वनविभागाचा प्रताप, वरिष्ठांचे दुर्लक्ष
अमरावती : वनजमिनींच्या सीमा दर्शविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आरसीसी पिलर (सिमेंट, गिट्टी व लोखंडाचा वापर करुन तयार झालेले खांब) मध्ये लाखोंचा अपहार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. निविदाविनाच कामे करुन वडाळी वनविभागाने अपहार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
वनजमिनींवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी संरक्षण कुं पण करताना वनांच्या सीमा निश्चितीसाठी आरसीसी पिलर लावण्याची नियमावली आहे. त्यानुसार सन २०१५ मध्ये वडाळी वनविभागाने जुने बायपास, वडाळी, वडरपुरा, पंचशीलनगर, आशियाना क्लब, वीटभट्टी परिसरात आरसीसी पिल्लर लावले आहे. मात्र हे आरसीसी पिल्लर लावताना अतिशय निकृष्ट दर्जाचे निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे हे पिल्लर वर्षभरात तुटू लागले आहेत. आरसीसी पिलर लावताना वनविभागाने नियमांना बगल दिली आहे. शासन निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कामे ही ई-निविदा प्रक्रि येद्वारे होणे अपेक्षित आहे. मात्र वडाळी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी मजूर लावून कामे केल्याचे देयके सादर करताना दर्शविले आहे. सुमारे ४०० आरसीसी पिलर लावण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र ६०० रुपये आरसीसी पिलर उभारणीसाठी लागले नसताना वडाळी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांनी १२०० रुपये याप्रमाणे देयके काढण्याचा प्रताप तक्रारीत नमूद आहे. वनजमिनींच्या सीमा दर्शविताना आरसीसी पिलरचा दर्जा चांगला असावा, यासाठी वन परिक्षेत्राधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात येते. मात्र आरएफओंनी वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिल्लर लावण्याची किमया केली आहे. आदिवासी मजूर लावून पिल्लर उभारण्यात आल्याचा दावा वडाळी आरएफओ करीत असले तरी केवळ अपहारासाठी निकृष्ट साहित्य वापरुन आरसीसी पिलर लावल्याचे स्पष्ट होत आहे. देयकांची उचल करताना पिल्लरची साफसफाई व रंगविणे यात अपहार झाल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक नंदागवळी यांनी मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
काय करतात सीसीएफ, डीएफओ, एसीएफ ?
वडाळी हा परिसर शहरात असून दरदिवसाला वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची ये- जा सुरुच राहते. मात्र वनजमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी अतिशय निकृष्ट दर्जाचे आरसीसी पिलर उभारण्यात आले असताना याकडे मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक व सहायक वनसंरक्षकांच्या लक्षात ही बाब येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वन्यजीव आणि वनांचे संरक्षण करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असताना आर्थिक अपहाराचे प्रकरण घडत असले तरी हे वरिष्ठ वनाधिकारी नेमके काय करतात? हा प्रश्न अनुत्तरित आहे.