त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:14 PM2019-03-02T23:14:14+5:302019-03-02T23:15:06+5:30

उन्हाळा लागला अन् तापमानात वाढ झाली की, खाजेच्या (गजकर्ण) आजारातही वाढ होते. १०० नागरिकांमागे ४० ते ५० जणांना या फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य) ला सामोरे जावे लागते. अनुभवी त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. या आजाराने नागरिक बेजार झाल्याचे दिसून येत आहे.

Rapid growth of vitiligo patients | त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

त्वचारोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देशंभर पैकी ५० रुग्णांना खाज : वेळीच उपाय करा; तज्ज्ञ डॉक्टरांचे मत

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हाळा लागला अन् तापमानात वाढ झाली की, खाजेच्या (गजकर्ण) आजारातही वाढ होते. १०० नागरिकांमागे ४० ते ५० जणांना या फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य) ला सामोरे जावे लागते. अनुभवी त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. या आजाराने नागरिक बेजार झाल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांना सर्वाधिक जांघेत खाजेचा त्रास असतो. यावर त्वरित उपचार न केल्यास हा आजार वाढत जातो. त्वचेवर लाल चट्टे पडतात तसेच हातांच्या बोटावरही काळपटपणा येतो त्या ठिकाणी असा त्वचारोग झाल्यास अनेकदा स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा वापर नागरिकांकडून प्राथमिक उपचाराच्या स्वरूपात केला जातो. तो टाळायलाच हवा, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे ठाम मत आहे.
त्वचारोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांमध्ये ४० ते ५० टक्के रुग्ण ही खाजेच्या आजाराने बाधित असतात. ेत्यातील ९० टक्क््यांपेक्षा जास्त रुग्णांनी मित्रमंडळी, नातेवाइकांच्या सांगण्यावरून तसेच खासगी मेडिकल स्टोअर्सच्या संचालकांच्या सल्ल्याने स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा वापर केलेला असतो व तो घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
खाजेची लक्षणं
खाज हा संसर्गजन्य आजार असून, बुरशीचा प्रकार आहे. यामध्ये शरीरावर लालसर खाजविणारे चट्टे येऊन ते गोलसर पसरत जातात. त्याला गजकर्ण (रिंग वर्म) असेही म्हणतात. ते नेहमी घामाच्या जागी येतात. जांघेत, बगलेत, छातीवर आढळून येतात. गजकर्ण शरीरावर डोक्यापासून तर नखापर्यंत कुठेही होऊ शकतो. शरीरावरील भागांवरुन त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले जाते, जसे शरीरावर असल्यास टिनिया कारपोरीस, केसांवर असल्यास टिनिया कॅपिटीस आदी.
औषधोपचाराने बरा न होणारा रेसिस्टंट टिनिया
आजाराचे औषधोपचार त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्यशिवाय बंद केल्याने तो पुन्हा झपाट्याने वाढतो. असे वाढलेले गजकर्ण जुन्या औषधांनी बरा होईलच असे नाही. बरेचदा त्याचे रूपांतर रेसिस्टंट टिनिया इन्फेक्शनमध्ये होते. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार घ्यावा.
कशी थांबवावी खाजेची लागण, प्रसार
नियमित आंघोळ करावी. ओले कपडे घालू नये. बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, चादर, कंगवा वापरू नये, घट्ट कपड्यांचा वापर टाळावा. सुती व सैल कपडे वापरावे. घरामध्ये गजकर्ण असलेल्या व्यक्तींनी एकासोबत उपचार सुरु करावा आदी उपाय या आजाराचा प्रसार थांबवितात.
खाजेची कारणे
अस्वच्छता, नियमित आंघोळ न करणे, गर्मी व घाम अंगावर काढणे, वाढते वजन, मधुमेह, बाधित व्यक्तीच्या कंगवा, कपडे, चादर आदींचा वापर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय मित्रमंडळी, नातेवाइकांचे ऐकून व मेडिकल स्टोअर्समधून औषध आणून स्वत:वर उपचार ही या आजाराची कारणे असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.
स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरण्याचे दुष्परिणाम
पूर्वी आठवड्यातून एका गोळीने कमी होणारे गजकर्ण आता रोजच्या चार गोळ्यांनाही मानत नाही. पूर्वी चार ते सहा आठवड्यामध्ये बरे होणारे त्वचेवरील गजकर्ण आता चार ते सहा महिन्यातही नाहीसे होत नाही. अशा प्रकारच्या स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरल्यामुळे गजकर्णच्या कारक फंगसमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे आढळले आहे.

या आजाराची लक्षणे जेव्हा आढळून येतात तेव्हा त्वचारोग तज्ज्ञांकडून उपचार केला पाहिजे. या आजारात वैयक्तिक स्वच्छता पाळणे अतिशय महत्त्वाचे असते.
- डॉ. ज्योत्सना किटुकले (देशमुख)
त्वचारोगतज्ज्ञ अमरावती.

Web Title: Rapid growth of vitiligo patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.