विदर्भात गारपिटीसह अवकाळी पाऊस, रब्बी अन् भाजीपाला पिके धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:09 IST2021-12-28T18:08:53+5:302021-12-28T18:09:50+5:30
धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून कास्तकाराचा मृत्यू

विदर्भात गारपिटीसह अवकाळी पाऊस, रब्बी अन् भाजीपाला पिके धोक्यात
अमरावती, यवतमाळ, वर्धा : मंगळवारी सकाळपासूनच धुक्याची चादर असलेल्या अमरावती शहरासह जिल्ह्यात दुपारी पाऊस बरसला. काही ठिकाणी गारपीटही झाली, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून गजानन बापूराव मेंढे (४२) या कास्तकाराचा मृत्यू झाला. अवकाळी गारपीटीमुळे रब्बीची पीके धोक्यात आली असून भाजापाला पिकांचेही नुकसान झाले आहे.
यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातही पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यात मोर्शी व अचलपूर तालुक्यात काही ठिकाणी हरभऱ्याऐवढी गार पडली. सध्याचे ढगाळ वातावरण तुरीसह हरभऱ्याला बाधक आहे. गारपीटमुळे भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, कळंब आणि यवतमाळ तालुक्यात पाऊस असून बाभूळगाव तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यात आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात पावसाची नोंद झाली असून पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, आर्वी तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस तर आष्टीसह आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.