कृषी पथकाची धाड, विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटी किमतीचे खत जप्त
By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: August 19, 2023 17:58 IST2023-08-19T17:57:45+5:302023-08-19T17:58:29+5:30
११,५७९ बॅग ताब्यात : जहांगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

कृषी पथकाची धाड, विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटी किमतीचे खत जप्त
अमरावती : राज्याचे कृषिमंत्री विभागात असताना कृषी विभागाने राबविलेल्या धाडसत्रात माहुली जहांगीर शिवारातील गोदामात अनधिकृत व विनापरवानगी साठवणूक केलेल्या ११५७९ रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २.३९ कोटींचा साठा जप्त करण्यात आला. आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा माहुली जहांगीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमरावती पं.स. चे कृषी अधिकारी उद्धव मयेकर यांच्या तक्रारीवरून माहुली ठाण्यात भादंवि ४२०,३४, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ याशिवाय रासायनिक खते (नियंत्रण) आदेशाच्या विविध कलमान्वये सुनील कुमार (उत्तर प्रदेश), सांभा अडपाल (क्षेत्रीय व्यवस्थापक, माहुली), अनंत वाडोकर (माहुली), पुरुषोत्तम साबळे (माहुली), महेशकुमार जाठ (भोपाल) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अमरावती पंसचे कृषी अधिकारी उद्धव मयेकर, कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर, जि.प.चे मोहीम अधिकारी प्रवीण खर्चे, विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक संजय पाटील, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सागर डोंगरे, माहुलीचे एपीआय मिलिंद सरकटे, पीएसआय संजय उदासी व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी ही संयुक्तपणे कारवाई केली.