रेबीजचा संशय, दोरखंडाने बांधले हातपाय
By Admin | Updated: April 3, 2017 00:03 IST2017-04-03T00:03:02+5:302017-04-03T00:03:02+5:30
रेबीजचा संशयित रुग्ण आक्रमक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

रेबीजचा संशय, दोरखंडाने बांधले हातपाय
पोलीस आयुक्तांच्या बंगल्यासमोरील घटना : चौकीदाराला नागपूरला हलविले
अमरावती : रेबीजचा संशयित रुग्ण आक्रमक अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणाजवळील रहिवासी राजेंद्र जाधव यांच्या बंगल्यावरील तो चौकीदार असून त्याला चवताळलेल्या अवस्थेत इर्विनच्या डॉक्टरांनी नागपूरला हलविले.
पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या बंगल्यासमोरच राहणारे राजेंद्र जाधव यांनी घराची देखरेख करण्यासाठी चौकीदार विनोद भारती (४५, रा.गगलानीनगर) यांची नेमणूक केली होती. मात्र, त्यांची रविवारी दुपारी अचानक प्रकृती अचानक बिघडली आणि ते चवताळत होते. जाधव यांच्या बंगल्यावर काही वर्षांपूर्वी जो चौकीदार होता त्याने एक श्वान पाळला होता. ते काही महिन्यांपूर्वी काम सोडून गेले. मात्र, श्वान जाधव यांच्या बंगल्यावरच होता. त्यानंतर चौकीदार विनोद भारती यांच्याकडे बंगल्याच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, दरम्यान तो श्वान विनोद भारती यांना चावला. त्यामुळे त्यांनी इर्विन रुग्णालयात उपचार घेतला. मात्र, त्यानंतरही विनोद भारती यांना तो श्वान चार वेळा चावल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी विनोद भारती हे चवताळलेल्या अवस्थेत बंगल्यावर आढळले. ते श्वानप्रमाणे वर्तणूक करीत होते. आरडाओरड, धावपळ करीत होते. हा प्रकार तेथून जाणाऱ्या सीआर व्हॅन पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी बंगल्याची पाहणी केली असता विनोद भारती हे चवताळलेल्या अवस्थेत आढळून आले.
रेबीजची अशी आहेत लक्षणे
रेबीज हा आजार विषाणूजन्य असून त्याला हायड्रोफोबिया सुध्दा म्हणतात. रेबीजबाधीत श्वानाच्या संपर्कात आल्यावर त्याच्या लाळेपासून तो आजार मनुष्यापर्यंत पोहचतो. रेबीज हा आजार मनुष्यासह प्राण्यालाही होऊ शकतो. रेबीजचा बाधीत रुग्ण पाण्याला भितो. रेबीजबाधीत रुग्णांच्या मानेचे स्नायू आंकु चन पावतात तसेच ते पॅरेलाईज होतात. अशाप्रसंगी पाणी पिण्याची इच्छा असली तरी तो रुग्ण पाणी पिऊ शकत नाही. गळ्यातून पाणी खाली उतरत नाही. या स्थिती रुग्णाची मानसिक संतुलन बिघडते आणि तो आक्रमक व चवताळल्यासारखा होतो. श्वानाप्रमाणे तो भुंकताना आढळून येतो, लाळ गाळतो, सैरावैरा पळतो, आरडाओरड करून कशालाही चावा घेण्याचा प्रयत्न करतो, अशी लक्षणे आढळून येतात.
रेबीजचा संशयित रुग्णाला इर्विन रुग्णालयात आणले होते. त्याची वतर्णूक श्वानाप्रमाणेच होती. यापूर्वी त्या रुग्णाला पाच ते सहा श्वान चावला आहे. त्याच्यावर उपचार सुरुच होता. मात्र,आता त्या रुग्णाची गंभीर स्थिती बघता नागपूरला हलविण्यात आले आहे.
- उज्वला मोहोड, वैद्यकीय अधिकारी.
रॅबीजबाधित रुग्णाच्या मानेचे स्नायू पॅरालाईज होत असल्यामुळे तो पाण्याला घाबरतो, पाणी पिण्याची इच्छा असली, तरी तो पाणी पिऊ शकत नाही. अशा स्थितीत मानसिक संतुलन बिघडून त्याचा मेंदूवरील ताबा सुटतो. या विषाणुजन्य आजारावर अॅन्टीरेबीज औषधी उपलब्ध नाहीत.
- एस.एस.गावंडे, पशुशल्य चिकित्सक, महापालिका