अमरावती : राज्यात मध्यवर्ती, जिल्हा आणि खुले कारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोरोना संसर्गामुळे नातेवाईकांसोबत भेटण्यावर बंदी होती. मात्र आता कोरोना ओसरत असतानादेखील कारागृहातील कैद्यांना दीड वर्षापासून नातेवाईंकांशी व्हिडीओ कॉलिंग, फोनद्धारे संवाद साधूनच समाधान मानावे लागत आहे. कारागृहात काेरोनाचा उद्रेक होऊ नये, यासाठी गृहविभागाच्या निर्देशानुसार कैद्यांसाठी कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे.
शासनाने राज्यात अनलॉक जाहीर केले असले तरी कारागृहाचे कामकाज ‘लॉक’ असेच सुरू आहे. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, नियमित हात धुणे आणि बाहेरील कैद्यांना १४ दिवस क्वारंटाईन नियमाचे पालन आजतागायत सुरू आहे. त्यामुळे दीड वर्षापासून कारागृहातील कैद्यांची नातेवाईंकांना भेटीची आस लागलेली आहे. गृहविभागाने कारागृहात कोरोनाबाबतची कठोर नियमावली कायम ठेवल्याने कैद्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ असल्याचे चित्र आहे.
---------------
ॲक्रेलिक काचेतून इंटरकॉम संवाद ‘ना’
कारागृहात कैद्यांचा नातेवाईकांशी ॲक्रेलिक काचेतून इंटरकॉमद्धारे संवाद ही प्रणाली दीड वर्षापासून ठप्प आहे. या प्रणालीद्धारे कैदी नातेवाईंकांशी संवाद साधताना थेट काचेतून बघू शकतो. ही प्रणाली राज्यभरात लागू आहे. मात्र, कोरोनामुळे कारागृहात बाहेरील व्यक्तींचा संपर्क होऊ नये, यासाठी कैद्यांची नातेवाईकांशी ॲक्रेलिक काचेतून ईंटरकॉम संवाद वजा भेट बंद आहे.
-----------------
नऊ मध्यवर्ती कारागृहात गर्दी वाढली
मुंबई आर्थर रोड, नाशिक, तडोजा, ठाणे, नागपूर, अमरावती, येरवडा (पुणे), औरंगाबाद, कोल्हापूर
एकूण बंदीस्त कैदी : ३२२५६
कारागृहात बंदीस्त क्षमता : २३२१७
-----------------
- आता १० मिनिटे व्हिडिओ कॉलिंग, फोनद्धारे संवाद
कैद्यांना नातेवाईकांशी थेट संवाद बंद आहे. मात्र, कोरोना काळात कारागृहातून कैद्यांना रक्ताच्या नातेवाईकांसोबत १० मिनिटे व्हिडिओ कॉलिंग, फोनद्धारे संवाद साधता येतो. अशाप्रकारे मध्यवर्ती कारागृहात स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली.