राज्यात कारागृहातील बंदीजनांना नातेवाईकांसोबत भेटीची आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST2021-06-27T04:09:55+5:302021-06-27T04:09:55+5:30
कोरोना संसर्गाचा परिणाम, केवळ व्हिडीओ कॉलिंग, फोनद्धारे संवाद अमरावती : राज्यात मध्यवर्ती, जिल्हा आणि खुले कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली ...

राज्यात कारागृहातील बंदीजनांना नातेवाईकांसोबत भेटीची आस
कोरोना संसर्गाचा परिणाम, केवळ व्हिडीओ कॉलिंग, फोनद्धारे संवाद
अमरावती : राज्यात मध्यवर्ती, जिल्हा आणि खुले कारागृहात विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना नातेवाईंकासोबत भेटीची गत वर्षभरापासून आस लागून आहे. कोराेना संसर्गामुळे कारागृहात इंटर कॉलिंग प्रणालीद्धारे बंदीजनांची नातेवाईकांसोबतची भेट वजा संवादाला ब्रेक लागला आहे.
गतवर्षी मार्चपासून कोरोनाचे आगमन झाले. कारागृहात संक्रमण होऊ नये, यासाठी गृृहखात्याने कठोर नियमावली लागू केली. यात शारीरिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, नियमित हात धुणे आणि नवीन कैद्यांना १४ क्वारंटाईन त्यानंतर जुन्या कारागृहात बंदीजनांची रवानगी करण्यात येत आहे. तसेच कारागृहात बंदीजनांशी नातेवाईंकाशी इंटरकॉलिंग प्रणालीद्धारे अक्रॅलिक काचेच्या आड २० मिनिटांची ईन कॅमेरा भेट हीदेखील बंद आहे. त्यामुळे कोरोनाने कारागृहातील बंदीजनांना सुद्धा हैराण करून सोडले आहे. हल्ली कोरोनाचे संक्रमण कमी झाले असताना कारागृहांमध्ये मात्र कोविड १९ च्या नियमावली लागू आहे. मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, स्वतंत्र महिला कारागृह, खुले कारागृह, विशेष महिला कारागृह येथे अद्यापही कोविड १९ नियमावलीचे पालन होत आहे.
----------------
राज्यातील कारागृहांवर एक नजर
मध्यवर्ती कारागृह : मुंबई आर्थर रोड, नाशिक, ठाणे, तडोजा, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, येरवडा (पुणे) - कारागृहात बंदीस्त संख्या : ३२०७६
- तात्पुरत्या कारागृहात बंदी संख्या: १२३७
- कारागृहात कोविड सेंटर : ९
- एकूण बंदीजन संख्या: ३३३२२
- कारागृहात एकूण बंदीजन क्षमता : २३२१७
------------------
बॉक्स
आता व्हिडीओ कॉलिंग अथवा फोनद्धारे १० मिनीटे संवाद
कोरोना संसर्गामुळे कारागृहात बंदीजनांची नातेवाईकांसोबतची भेट बंद आहे. मात्र, यात बराच बदल करण्यात आला आहे. आता कारागृहातून बंदीजनांना रक्ताच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलींग अथवा फोनद्धारे १० मिनीटे संवाद करता येतो. त्याकरिता कारागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------
कोट
गतवर्षी मार्चपासून कोरोनामुळे बंदीजनांची नातेवाईंकासोबतची भेट बंद आहे. गृह खात्याच्या निर्देशानुसार कोविड १९ च्या नियमांचे पालन होत आहे. त्याअनुषंगाने आठवड्यातून दोनदा बंदीजनांना रक्ताच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉलिंग अथवा फोनद्धारे १० मिनीटे संवाद करता येतो.
- रमेश कांबळे अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती