गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:07+5:302021-02-27T04:16:07+5:30

लाभार्थी झाले त्रस्त, आठशे रुपयांचे सिलिंडर कसे परवडेल? अमरावती : ‘धूरमुक्त स्वयंपाकघर’ या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी ...

Poor 'Ujjwala' on gas stove again! | गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर !

गरिबांची ‘उज्ज्वला’ गॅसवरून पुन्हा चुलीवर !

लाभार्थी झाले त्रस्त, आठशे रुपयांचे सिलिंडर कसे परवडेल?

अमरावती : ‘धूरमुक्त स्वयंपाकघर’ या संकल्पनेला छेद देणारी गॅस सिलिंडरची गगनचुंबी दरवाढ केंद्र सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी राबविलेल्या उज्ज्वला योजनेला फोल ठरवित आहे. लाभार्थींना मोफत कनेक्शनसोबतच प्रथम सहा सिलिंडर मोफत देण्यात आले. सातव्या सिलिंडरपासून दरवाढ थांबलेली नाही. ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.

कोरोना साथीनंतर कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता हळूहळू चुलीवरील स्वयंपाकाकडे वळत आहेत. सध्या ग्रामीण भागातील ३० ते ४० टक्के महिला चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यात काहींची नोकरी गेली. अनेकांची वेतनकपात झाली. हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व काही रुळावर येत असल्याचे वाटत असतानाच पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत मोठी दरवाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांसोबत गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले. उज्ज्वला गॅस योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांची इंधन जमा करण्याची कटकट मिटली, असे म्हणत नाही तोच आता कोरोनामुळे नुकसान झालेली अनेक कुटुंबे पूर्वीच्या चुलीवरच्या स्वयंपाकाकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना साथीनंतर दरवाढ झालेल्या सिलिंडरसाठी पैशांची जुळवणूक करताना गोरगरिबांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी चुलीवर स्वयंपाकाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले.

बॉक्स

१)अनलॉक झाल्यानंतरही रोजगाराचा अभाव आहे. दोन वेळा पोट भरण्याची भ्रांत कायम असताना स्वयंपाकासाठी लागणारे गॅस सिलिंडर तरी कसे आणायचे, असा प्रश्न उज्वला योजनेच्या लाभार्थींसमोर आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील चुलीतून पुन्हा धूर येऊ लागला आहे.

२) मार्च २०२० पासून कोरोनाच्या संकटाने त्यावर भर घातली. हातमजुरी करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. बाहेर रोजगार मिळेनासा झाला. आतापर्यंत जुळविलेल्या रकमेवर जगण्याची वेळ आली. एप्रिल ते जून अशी तीन महिने सरकारने सिलिंडरची व्यवस्था करून दिली.

३) लाभार्थींच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले. मात्र, आता दरवाढीने डोके वर काढल्याने गॅस सिलिंडर परवडत नसल्याचे महिलांनी सांगितले. पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाक व पाणी तापविले जात आहे.

बॉक्स

घरगुती गॅस सिलिंडरच्या दराचा आढावा

जानेवारी २०२० - ७३५

जुलै २०२० - ६१६

जानेवारी २०२१ - ७७९

फेब्रुवारी २०२१ - ८१९

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे जिल्ह्यातील लाभार्थी - १३१२४८

बॉक्स

लाभार्थींच्या प्रतिक्रिया

कोट

अनलॉक झाले असले तरी रोजगार उपलब्ध झालेला नाही. हातमजुरी करून मिळणाऱ्या पैशांत काही बाजूला टाकून त्यातून सिलिंडर आणण्याची स्थिती आता नाही. पैसा शिल्लक पडला की, तजवीज करू. तोपर्यंत लाकडावर स्वयंपाक करणे भाग आहे.

- सुभद्रा मानकर, लाभार्थी

कोट

गॅस सिलिंडरच्या दरवाढीने चुलीचा वापर वाढला आहे. सरकारने रॉकेल देणे बंद करून सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले. आमच्याकडे दरमहा एक सिलिंडरचा वापर होतो. सरकारने गॅसचे दर कमी करावे.

- सविता सहारे, लाभार्थी

कोट

कोरोनामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले आहे. त्यात गॅसची दरवाढ ही मोठी डोकेदुखी बनली आहे. आम्ही आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस चुलीवर स्वयंपाक करतो.

- लाडकूबाई सहारे, लाभार्थी

कोट

आम्ही मागील काही महिन्यांपासून गॅसचा वापर कमी केला आहे. शेतातून लाकडे गोळा करून आणतो. सकाळी आंघोळीसाठी लागणारे पाणी तापविण्यासाठी चुलीचा वापर करतो. सायंकाळचा स्वयंपाक चुलीवर होतो.

- मनोरमा मेश्राम, लाभार्थी

कोट

उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, दर वाढल्याने आता ते परवडेनासे झाले आहे. त्यात रॉकेल नसल्याने स्टोव्हसुद्धा बंद आहे. नाईलाजास्तव चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली आहे.

- छबुताई उके, लाभार्थी

Web Title: Poor 'Ujjwala' on gas stove again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.