Political flakes, loud banners to delete banners | राजकीय फ्लेक्स, बॅनर हटविण्यास जोरात प्रारंभ

राजकीय फ्लेक्स, बॅनर हटविण्यास जोरात प्रारंभ

ठळक मुद्देबाजार, परवाना विभाग लागला कामाला : भूमिपूजनाचे फलक झाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिका प्रशासनाने शनिवारी राजकीय फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्स हटविण्याची वेगवान कारवाई केली. पहिल्याच दिवशी शेकडो प्रचार साहित्य झाकण्याची उल्लेखनीय कार्यवाही केली. शहरात रविवारी भूमिपूजनाचे फलक झाकण्यात आले. प्रचारसाहित्यावर स्टिकर लावून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारपासून जाहीर होताच महापलिका आयुक्त संजयकुमार निपाणे यांनी बाजार परवाना विभागाला राजकीय चमकोगिरीला आळा बसवून आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत निर्देश दिले. त्यानुसार शनिवारी दुपारपासूनच बाजार परवाना विभागाने पोलीस संरक्षणात राजकीय होर्डिग्ज, बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर हटविण्याची युद्धस्तरावर कार्यवाही चालविली. तर, दुसरीकडे वस्ती, नगरांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजनाचे फलक, प्रचारसाहित्य झाकण्यासाठी चमू कार्यरत असल्याचे दिसून आले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच मतदारांवर राजकीय प्रभाव पडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने युद्धस्तरावर कार्यवाही चालविली आहे. राजकीय पक्ष अथवा पुढाऱ्यांचे वाढदिवस, शुभेच्छा, अभीष्टचिंतन, नियुक्त्या, जाहीर कार्यक्रमांचे बोर्ड आणि फ्लेक्स, विकास निधीतून कामांचे फलक, दिशादर्शक सोसायटी, सौजन्य किंवा संकल्पना म्हणून लोकप्रतिनिधींची नावे असलेले फलक झाकण्यात येत आहेत. सार्वजनिक बेेंचवरील नावे, वाचनालये, उद्घाटन समारंभ, अनावरण, कोनशिला, नगरसेवकांची नावे, पक्षाची चिन्हे, चिन्हांशी साधर्म्य आदींवर रंग अथवा चिटकविण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू होताच महापालिका प्रशासनाने राजकीय फ्लेक्स, बॅनर्स हटविण्याची कार्यवाही केल्यामुळे ही संख्या हजारोंच्या घरात पोहचली आहे.

Web Title: Political flakes, loud banners to delete banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.