तक्रारकर्त्यांच्या ‘फीडबॅक’मधून होणार पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:13 AM2020-12-22T04:13:51+5:302020-12-22T04:13:51+5:30

अमरावती - कुण्या सामान्य इसमावर अन्याय झाला असेल, तर त्याला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी कुणाची ओळख वापरण्याची गरज का ...

Police stations will be evaluated from the feedback of the complainants | तक्रारकर्त्यांच्या ‘फीडबॅक’मधून होणार पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन

तक्रारकर्त्यांच्या ‘फीडबॅक’मधून होणार पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन

Next

अमरावती - कुण्या सामान्य इसमावर अन्याय झाला असेल, तर त्याला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी कुणाची ओळख वापरण्याची गरज का पडावी? सामान्यांना पोलीस ठाणे आपले-हक्काचे वाटायला हवे. पोलिसांच्या कार्यशैलीत हा बदल मला घडवून आणायचा आहे. त्याची सुरुवात झाली आहे. यापुढे तक्रारदारच पोलीस ठाण्याचे मूल्यमापन करतील. पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वंकष अनुभवाचा ''''फीडबॅक'''' पोलीस ठाणेप्रमुखाच्या कार्यशैलीचे प्रमाण ठरेल, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह ''''लोकमत''''शी बोलत होत्या.

देशभरात वर्तमान स्थितीत नऊ राज्यांतच पोलीस आयुक्तालये आहेत. त्यांची एकूण संख्या ३५ आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह या देशभरातील एकमेव महिला पोलीस आयुक्त आहेत. महिलांच्या यशोतेजाचा इतिहास असलेल्या अंबानगरीत त्यांचे पोस्टिंग असणे हा अमरावतीसाठी मानाचा तुराच. केवळ खाकी गणवेशाची ‘क्रेझ’ असल्यामुळे आरती सिंह या आयपीएस झाल्या नाहीत. त्यांच्या या यशाच्या दरवळामागे स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या सामाजिक वेदनांतून जन्मलेली स्वयंसिद्धतेची जिद्द आहे.

एमबीबीएस आणि गायनॉकोलाॅजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आरती सिंह शासकीय रुग्णालयात स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ या पदावर रुजू झाल्या. त्यादरम्यान अनेक प्रसूती हाताळताना मुलगी झाल्यामुळे नाराज होणारे नवजाताचे आप्तस्वकीय बघणे हा त्यांचा नित्यनुभव ठरला. कुटुंबच नाखूश असल्यामुळे प्रसववेदना सहन करून बाळाला जन्म देणारी माताही मुलगी झाल्याने दुखी-कष्टी व्हायची. स्त्रियांप्रति समाजाला वाटणारा हा तिटकारा आणि ‘स्त्री म्हणजे ओझे’ ही भावना दूर करण्यासाठीचे पाऊल उचलायलाच हवे, असा निर्धार डाॅक्टर असलेल्या आरती सिंह यांनी केला. स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची चमक चौखूर उधळू शकेल असे कार्य करण्यासाठी त्यांनी ‘आयपीएस’ व्हायचे ठरविले. जिद्द प्रत्यक्षात उतरली. २००६ च्या बॅचमध्ये त्या ‘आयपीएस’ उत्तीर्ण झाल्यात. दोन हजारांहून अधिक पोलिसांच्या प्रमुख असलेल्या पोलीस आयुक्त आरती सिंह शहरातील आठ-नऊ लक्ष लोकांच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यास सज्ज आहेत.

नक्षल्यांशी दोन हात

आरती सिंह या परीविक्षाधीन कालावधीत नक्षल्यांच्या कारवायांमुळे सर्वाधिक संवेदनशील क्षेत्र असलेल्या गडचिराेलीच्या भामरागड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर रुजू झाल्या. अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाल्यावरदेखील त्यांची पोस्टिंग गडचिरोली जिल्ह्यातच होती. त्यांच्या कार्यकाळात नक्षलविरोधी मोहिमा त्यांनी राबविल्या. नक्षल्यांचे मनसुबे खारीज करून सन २००९ च्या विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. पुढे त्यांना भंडारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक मिळाली. त्यावेळीदेखील महाराष्ट्र राज्यातील एकूण ३२ एसपींपैकी त्या एकमेव महिला एसपी ठरल्या.

चमकदार कामगिरी

चमकदार कामगिरीसाठी त्यांना केंद्र शासनाचे विशेष सेवा पदक, राज्य शासनाचे खडतर सेवा पदक, पोलीस महासंचालकांचे ‘डी.जी.इन्सिग्निया’ हे पदक देऊन गाैरविण्यात आले. ‘डी.जी.इन्सिग्निया’ हे पदक एरवी १५ वर्षांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेनंतर दिले जाते; परंतु आरती सिंह यांना ते अवघ्या वर्षभरातील सेवाकाळानंतर प्रदान करण्यात आले, ते त्यांच्या परिणामकारक कामगिरीमुळेच! नाशिक एसपी असताना कोरानादरम्यान मालेगाव येथील प्रभावी कामगिरीसाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेणारे पत्र सिंह यांना लिहिले आहे. त्याची नोंदही सेवापुस्तिकेत घेण्यात आली आहे.

चोरांना भय आणि नागरिकांना सोय

‘चोरांना भय आणि नागरिकांना सोय’ निर्माण करणारे लोकाभिमुख पोलिसिंग प्रत्यक्षात आणणे हा आरती सिंह यांचा उद्देश आहे. पोलिसांना कामाचा ताण असतो, हे खरे असले तरी पोलीस सामान्यांच्या रक्षणासाठी आहेत. कुण्याही- शिक्षित वा अशिक्षित; गरीब वा श्रीमंत व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आपलेपणाने पोलीस ठाण्यांत आणि पोलीस चाैक्यांत जावेसे वाटायला हवे, असे चित्र निर्माण करणे हे देखील पोलिसांचेच कर्तव्य आहे, असे त्या ठामपणे सांगतात. त्यासाठीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यांनी प्रत्येक ठाण्यात आता ‘फीडबॅक फाॅर्म’ अर्थात नागरिकांचे अभिप्राय नोंदविण्यासाठीचे शासकीय दस्तऐवज ठेवले आहेत. तक्रारकर्त्यांना त्यात अभिप्राय लिहून द्यावयाचे आहेत. तक्रार देण्यासाठी आलेल्यांशी पोलीस अंमलदाराची वागणूक कशी होती, तक्रार स्वीकारली काय, त्यात काही अडथळे किंवा अडचणी निर्माण करण्यात आल्यात काय, सहकार्य केले की कसे, तक्रारकर्ता या नात्याने तुमचे समाधान झाले काय, अशा बारीकसारीक बाबींबाबत हे अभिप्राय असतील. विशेष असे की, स्वत: पोलीस आयुक्त आरती सिंह ते अभिप्राय वाचतील. ज्या पोलीस ठाण्याचे काम असमाधानकारक असेल, त्या पोलीस ठाण्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सायबर क्राइम आणि वाहतूक नियंत्रणावर घारीची नजर

- सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. गुन्हेगार चाणाक्षपणे गुन्ह्यांच्या पद्धती बदलवून नागरिकांना लुटताहेत. विशेषत: महिला वर्ग आणि गरीब लोक याचे अधिक बळी ठरले आहेत. गुन्ह्यांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी जागृतीवर विशेष फोकस आहे.

- शहरातील वाहतूक प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी चाैकाचाैकांत सीसीटीव्ही कॅमेरे लागतील. या यंत्रणेद्वारे नियम तोडणाऱ्या वाहनाचा क्रमांक कॅमेराबद्ध केला जाईल. वाहनमालकाला नोटीस बजावली जाईल.

- कोरानानंतर मुलींसाठी ‘सेल्फ डिफेन्स’ या विषयावर प्रत्यक्ष काम केले जाईल.

आठवणीतील कारवाई

- शहरातील चाैकाचाैकांत पारधी समाजाच्या लहान मुलांनी धुमाकूळ घातला होता. दोन महिने सातत्याने त्यांना पकडून त्यांच्या गावी सोडले; परंतु ते पुन्हा परतले. वाहतुकीला अडथळा आणि त्या लहानग्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. अखेरीस चाैकात आढळणाऱ्या मुलांच्या पालकांवर कठोर गुन्हे दाखल करणे सुरू केले. ती मुले चाैकांतून नाहीशी झाली.

- नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी डांबून ठेवलेली ७५ जनावरे मुक्त केली.

माहिती उघड करताना भान जपा, मुलींसाठी संदेश

‘सोशल मीडिया’वर प्रत्येक मुलीचे स्वतंत्र अकाऊंट आहे. त्यात मुली बिनधास्तपणे खासगी माहिती उघड करतात. सायबर गुन्हेगार याच माहितीच्या मागावर असतात. समाज माध्यमांवरील अकाऊंट हाताळताना कुठली माहिती उघड करू नये, याचे भान मुलींनी आवर्जून ठेवावे. लहानशी चूक महागात पडू शकते, याचे भान असू द्या, असा संदेश आरती सिंह यांनी मुलींसाठी दिला आहे.

Web Title: Police stations will be evaluated from the feedback of the complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.