अपघातग्रस्ताच्या विव्हळण्याचे फोटोसेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:27 IST2018-11-17T22:26:47+5:302018-11-17T22:27:09+5:30
मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.

अपघातग्रस्ताच्या विव्हळण्याचे फोटोसेशन
नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.
गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास परतवाडा-धारणी मार्गावरील बिहाली नर्सरीजवळ चांदूरबाजार-भांडुम एसटीची दुचाकीला धडक बसली. यात ठुनू धिकार (६२, रा. जारिदा) यांच्या पायावरून चाक गेल्याने त्यांना रस्त्यावरून उठणे शक्य होत नव्हते. अपघात होताच एसटीमधील प्रवासी निघून गेले. चालक-वाहक रुग्णवाहिका व अन्य बसची व्यवस्था करतो म्हणून घटनास्थळावरून चालते झाले. अन्य कुणीही १५ किमीवरील परतवाडा शहरात आणण्याची तसदी घेतली नाही.
दोन तास रस्त्यावर पडून
गुरुवारी सायंकाळी ४ वाजता अपघात झाल्यानंतर त्याच रस्त्याने परतवाडा शहरातील विजय मिश्रा नामक सामाजिक कार्यकर्ता घटांग येथे जात होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच रस्त्याने जाणाºया वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच थांबले नाही. अशात एसटी बसचे चालक-वाहक रुग्णवाहिका पाठवतो म्हणून चालते झाले. जखमीला मदत मिळाली असावी, असे समजून विजय मिश्रा तेथून निघून गेले. मात्र, दोन तासानंतर परत जात असताना त्यांना ठुनू धिकार हे तेथेच जखमी अवस्थेत पडून दिसले.
एक पाय निकामी
ठुनू धिकार यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात चिरडल्याने त्यांचा एक पाय कापण्यात आला असल्याची माहिती सुदामा मासागोले या त्यांच्या जावयाने दिली. शासनातर्फे अपघाती व्यक्तीस मदत व रुग्णालयात पोहचविल्यास पोलिसांतर्फे कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नसल्याच्या जाहिराती केल्या जातात. तरीसुद्धा शासकीय रुग्णवाहिका वरिष्ठांच्या दबावाखाली थांबत नाहीत. सामान्य नागरिक अपघात पाहून काढता पाय घेतात.