पाणीवापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम राबवा
By Admin | Updated: March 17, 2016 00:17 IST2016-03-17T00:17:56+5:302016-03-17T00:17:56+5:30
मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.

पाणीवापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम राबवा
जिल्हाधिकारी : जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ
अमरावती : मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरातील रिक्षाच्या संख्येपेक्षाही पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक आहे. अशी भीषण स्थिती आपल्याकडे येणार नाही असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही यासाठी पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आलेल्या गावांपैकी ३-४ गावासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन करावी व अशा संस्थांवर पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करुन घेण्यासाठी कृषि विभागाने पाणी वापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले.
जिल्ह्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बचत भवनमध्ये जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्पाचे पाणी कलशमध्ये आणण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता र.प्र.लांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता घाणेकर, पोहेकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते.
गीत्ते म्हणाले, येणाऱ्या काळात शेतीला कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी पाईप लाईनने पाणी देण्याचा शासन विचार करत आहे. पाईप लाईनद्वारे पाणी दिल्यास उत्पादन क्षमता ४० वरुन ८०-९० टक्के पर्यंत कार्यक्षमता वाढते. जिल्ह्यात ठिबक, तुषार मोहिम राबविण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यावर २५ टक्के सबसिडी असून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन अर्ज प्राप्त आहे. जलसंपदा विभाग पाण्याची साठवणूक जरी करत असेल तरी पाण्याचा खरा ग्राहक कृषि विभाग आहे. या विभागाचा शेतकऱ्यांवर अधिक प्रभाव आहे यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.अशी सूचना देखिल जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.