भरधाव कारने पादचारी दाम्पत्याला उडविले; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

By प्रदीप भाकरे | Updated: October 28, 2022 18:25 IST2022-10-28T18:24:35+5:302022-10-28T18:25:54+5:30

साईनगरातील घटना

Pedestrian couple struck by speeding car; Wife dead, husband serious | भरधाव कारने पादचारी दाम्पत्याला उडविले; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

भरधाव कारने पादचारी दाम्पत्याला उडविले; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

अमरावती : रस्त्याने पायदळ जात असलेल्या पती-पत्नीला भरधाव कारने उडविले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर येथे हा अपघात घडला. अपघातानंतर कारचालकासह एका महिलेने घटनास्थळाहून पळ काढला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पुष्पा बंडू चांदूरकर (४५) असे मृताचे तर बंडू महादेव चांदूरकर (५३, दोघेही रा. मधुसुदन कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. पुष्पा या पती बंडू यांच्यासह पायदळ कामावर जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने मागून आलेल्या कार क्रमांक एमएच २७ डीए ३४५७ ने दोघांनाही जोरदार धडक दिली. या अपघातात पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर बंडू हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने कार घटनास्थळीच सोडून पळ काढला.

हा प्रकार लक्षात आल्यावर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी बंडू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुष्पा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार, त्या कारचालकाने आधी एका दुचाकीला देखील धडक दिली. तर चांदूरकर दाम्पत्याला धडक दिल्यानंतर ती कार भिंतीला धडकून थांबली. कार आणि भिंतीच्या मधोमध पुष्पा चांदुरकर या दबल्या होत्या, ते दृष्य हृद्य हेलावणारे होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Web Title: Pedestrian couple struck by speeding car; Wife dead, husband serious