बारावी फेरपरीक्षेत पास; प्रवेशाचे काय ?
By Admin | Updated: September 1, 2016 00:19 IST2016-09-01T00:19:26+5:302016-09-01T00:19:26+5:30
बारावी फेरपरीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर झाला आणि अनेकांच्या ‘नापास’चा शिक्का पुसला गेला.

बारावी फेरपरीक्षेत पास; प्रवेशाचे काय ?
प्रतीक्षा : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लागली चिंता
अमरावती : बारावी फेरपरीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर झाला आणि अनेकांच्या ‘नापास’चा शिक्का पुसला गेला. दुसरीकडे महाविद्यालयीन प्रवेशाची मुदत संपली आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची मुख्य परीक्षा झाली आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने मंडळाने नऊ ते २९ जुलैदरम्यान फेरपरीक्षा घेतली आणि आॅनलाईन निकाल जाहीरही झाला त्यात अमरावती विभागातून १० हजार १३८ पैकी १ हजार ८७३ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. मार्च २०१६ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया जून, जुलै मध्ये घेण्यात आली. याशिवाय कृषी व अकृषी विद्यार्थ्यांनी सुद्धा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रक्रिया पूर्ण करीत महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. विशेष म्हणजे बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा शुल्काची अंतिम मुदतही संपली आहे तर दुसरीकडे पदवी प्रथम वर्षाची प्रथम सत्र परीक्षाही आता जवळ आली आहे. प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.