‘पाटबंधारे’त ओल्या पार्ट्या !
By Admin | Updated: November 6, 2016 00:06 IST2016-11-06T00:06:25+5:302016-11-06T00:06:25+5:30
उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.

‘पाटबंधारे’त ओल्या पार्ट्या !
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या
संदीप मानकर अमरावती
उर्ध्व वर्धा पाटबंधारे व मालमत्ता उपविभागाच्या इमारतीच्या मागे दारूच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.
या परिसरात मद्यपी यथेच्छ दारू ढोसून ओल्या पार्ट्या झोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून या परिसरात दारूच्या बाटल्या येतात कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या परिसरात फेरफटका मारला असता, हा गंभीर प्रकार निदर्शनास आला. येथे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंत्याचेसुध्दा कार्यालय आहे. कार्यालयाच्या अगदी बाजूलाच पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वसाहतदेखील आहे. रोज ओल्या पार्ट्या करून विविध ब्रॅन्डच्या दारूच्या बॉटल्स खुलेआम या परिसरात बेवारसरीत्या आढळून आल्या. मात्र मद्यपी कोण? व दारुच्या पार्ट्या येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी तर होत नाही ना? की, बाहेरचे काही युवक या ठिकाणी येऊन मद्यप्राशन करतात याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
निष्क्रिय सुरक्षा गार्ड
अमरावती : हा प्रश्न अंबानगरीतील जनतेला पडला आहे. या ठिकाणी सायंकाळनंतर परिसर सुनसान होतो. त्यामुळे याच संधीचा फायदा घेऊन अंधारात मद्यप्राशन केले जात असेल तर कर्तव्यावर असलेले सुरक्षा गार्ड करतात तरी काय, असा प्रश्नही पुढे आला आहे. हा प्रकार गंभीर असून वरिष्ठ अभियंत्याच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कचऱ्यात ह्या बॉटल्स, काही डिसपोजल ग्लास, मिनरल वॉटरच्या खाली बाटल्या, सिगारेटचे रिकामे पाकीट्स या ठिकाणी आढळलेत. त्यामुळे परिसरात अनेक दिवसांपासून खुलेआम ओल्या पार्ट्या झोडल्या जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून हा प्रकर बंद करण्यात यावा, ही मागणी होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वसाहतीकडे दुर्लक्ष
येथे पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मध्यरात्रीपर्यंत या वस्तीकडे जाणारे प्रवेशव्दार उघडे राहते. त्यामुळे मद्यपींना येथे मद्यपान करणे सोईची ठरते. याच ठिकाणी जलसंपदा विभागाची नवीन इमारतसुद्धा आहे. बाजूलाच जलसंपदा विभागच्या वरिष्ठ अभियंत्यांचे निवास्थाने आहेत. तसेच येथे परंतु याकडे गस्तीवर नियमित चौकीदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. येथे ३५० कर्मचाऱ्यांची निवास्थाने असल्याची महिती आहे. त्यामुळे येथे नेहमीत सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची माहिती घेतो. असा प्रकार खरेच होत असेल तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. बाहेरच्या लोकांचा या परिसरात वावर असेल तर त्यांचाही बंदोबस्त करण्यात येईल.
- रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग अमरावती