स्नेहाला बघताच आई-वडिलांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST2022-03-05T05:00:00+5:302022-03-05T05:00:49+5:30
वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन तिने रेल्वेने पोलंडची सीमा गाठली. वरूडमधून युक्रेनला शिक्षण घेणारी ती एकमेव आहे.

स्नेहाला बघताच आई-वडिलांचे डोळे पाणावले
प्रशांत काळबेंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनमधून बाहेर पडून नागपूर विमानतळावर स्नेहा विमानातून सुखरूप उतरताच आई-वडिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या.
वरूड येथील माजी सैनिक भीमराव लांडगे यांची मुलगी स्नेहा लांडगे (२०) ही खारकीव्ह शहरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. युद्ध लागताच तिची रवानगी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधून बंकरमध्ये झाली. १ मार्च रोजी प्राण मुठीत घेऊन काही भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन तिने रेल्वेने पोलंडची सीमा गाठली. वरूडमधून युक्रेनला शिक्षण घेणारी ती एकमेव आहे.
दूतावासाची मदत सीमेवर
ऐन युद्धाच्या भडक्यात रेल्वेने शेकडो किमी प्रवास करून सीमा गाठणाऱ्या स्नेहाने दूतावासाची मदत युक्रेनबाहेरच मिळाल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांच्या सोबतीने पोलंड या देशाच्या सीमेजवळ पोहोचल्यावर भारतीय अधिकारी चौकशीला आले.
आई-वडिलांसोबत आले ग्रामस्थही
सैनिक मित्राच्या मुलीला घेण्यासाठी सुखरूप परत येत असल्याने जरूड येथील सरपंच माजी सैनिक सुधाकर मानकर, अरुण हरले आणि स्नेहाचे आई-वडील नागपूर विमानतळावर पोहोचले.
शिक्षण शुल्क वाजवी असल्यास थांबेल स्थलांतर
भारतीय शिक्षण प्रणालीत बदल करून होतकरू विद्यार्थ्यांना इच्छित अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी जर शासनाने बदल केले, तर आपल्या देशातील विद्यार्थी हा परदेशात जाणारच नाही. त्यात अभ्यासक्रम शुल्क देखील जास्त आहेत. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही स्नेहा म्हणाली.