गीत-संगीतात रंगली 'पाडवा पहाट'

By Admin | Updated: March 22, 2015 01:26 IST2015-03-22T01:26:21+5:302015-03-22T01:26:21+5:30

पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मानवी नात्यांची वीण सैल होत चालली आहे.

'Padva Dawaat' song written in music | गीत-संगीतात रंगली 'पाडवा पहाट'

गीत-संगीतात रंगली 'पाडवा पहाट'

अमरावती : पाश्चात्यांचे अंधानुकरण करीत जागतिकीकरणाच्या संकल्पनेत मानवी नात्यांची वीण सैल होत चालली आहे. मानवी नातेसंबंध जपणारी आपली भारतीय संस्कृती आहे. नात्यांचे सैल होत जाणारे भावबंध जपण्याचा संदेश संस्कार भारतीच्यावतीने आयोजित पाडवा पहाट सोहळ्यातून देण्यात आला.
मागील १५ वर्षांपासून अमरावतीकरांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या ‘पाडवा पहाट’ उपक्रमाला अमरावतीकर रसिकांनी यंदाही अपार गर्दी केली होती. नेत्रदीपक आतषबाजी, भव्य रंगमंच व सुमारे शंभराहून अधिक कलाकारांच्या सामूहिक कलाविष्काराने नववर्षाची पहिली पहाट स्थानिक व्यंकटेश लॉनच्या मंचावर उगवली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा, सत्र न्यायाधीश अरुण ढवळे, भाजपाचे विभागीय संघटनमंत्री रामदास आंबटकर, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण धांदे, विधिज्ञ प्रवीण मालू, सूरमणी प्रा. कमल भोंडे, प्रांत संघटनमंत्री अजय देशपांडे, मोहन काटे यांच्यासह अमरावती शाखेच्या अध्यक्ष जयश्री वैष्णव यांच्या उपस्थितीत गुढीचे पूजन करण्यात आले.
‘मानवी नाते-काल आणि आज ’ या संकल्पनेवर हा कार्यक्रम रंगला. तरुण व नव्या दमाच्या कलाकारांनी एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण केले. मोहन बोडे यांच्या मार्गदर्शनात शीतल मेटकर, सुरभी बोडे, प्रकाश मेश्राम, हर्षदा पातुरकर आणि रसिका वडवेकर- वानखडे यांनी विविध नृत्यांचे दिग्दर्शन केले. अश्विनी पारळकर यांच्या मार्गदर्शनात प्रसाद खरे यांनी नाट्यछटा सादर केली. ‘कुंजवनातील सुंदर राणी’ या चित्रपट गीतातून मानवी नात्यांची रूपे काळानुसार कशी बदलत गेली, हे दर्शविले. नंतर ‘मेरी माँ’ या व ‘दमलेल्या बाबांची कहाणी’ या गीतांवर अनुक्रमे आई व बाबांचे नाते सादर केले गेले. आपल्या जीवनातील आई-बाबांच्या स्थानाविषयीची काही हळुवार दृश्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
मनोहरराव कवीश्वर यांच्या ‘गीत गोविंद’मधील ‘चिंधी’ गीतातून द्रौपदी आणि श्रीकृष्णाच्या नात्याचे भावबंध उलगडले. ‘जीवन आपुले सार्थ करा रे’ या गीतातून छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी यांचे शौर्य व लोकमान्य टिळक यांचे दर्शन प्रेक्षकांना घडून आले. ‘नात्याला काही नाव नसावे’ यातूनही मानवी नात्यांमधला हळुवारपणा प्रगट झाला. ‘मामाच्या गावाला जाऊ या’ या गीतावर वरदा पाठक व गायत्री खरे यांनी केलेली झुकझुक गाडी व इतर रेखाटने आकर्षणाचे केंद्र ठरली.
शिवराय कुळकर्णी व अश्विनी पारळकर यांच्या संवादात्मक निवेदनातून कथासूत्र समोर सरकत गेले. जयश्री वैष्णव, आल्हाद व आलोक आळशी, स्वागता पोतनीस, आशुतोष देशपांडे यांच्यासह मयूर जोशी, अंबिका ठाकरे, मुकुंद सूर्यवंशी, शुभम पांडे, अभिराम लोमटे, केतकी मोहदरकर, यांनी गायन व समूह स्वरात भाग घेतला. गायकांना प्रशांत अग्निहोत्री (बासरी), श्रेयस वैष्णव (सिंथेसायझर), प्रसाद पांडे, स्वप्नील सरपोतदार (तबला), अभिजीत भावे (गिटार),सुभाष वानखडे (आॅक्टोप्याड) यांनी साथसंगत केली.

Web Title: 'Padva Dawaat' song written in music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.