संतापजनक ! पाच वर्षीय अबोध बालिकेशी कुकर्म; 20 वर्षीय आरोपीला अटक
By प्रदीप भाकरे | Updated: January 8, 2023 14:18 IST2023-01-08T14:17:16+5:302023-01-08T14:18:00+5:30
दर्यापुर तालुक्यातील अश्लाघ्य घटना : आरोपी अटक

संतापजनक ! पाच वर्षीय अबोध बालिकेशी कुकर्म; 20 वर्षीय आरोपीला अटक
अमरावती: पाच वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची संतापजनक घटना दर्यापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. ७ जानेवारी रोजी दुपारी २.३० च्या सुमारास हा अश्लाघ्य प्रकार घडला. याप्रकरणी, दर्यापूर पोलिसांनी आरोपी चिट्या उर्फ प्रज्वल हिवराळे (२०, ता. दर्यापूर) याच्याविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.
तक्रारीनुसार, ती पाच वर्षीय अबोध बालिका खेळत असताना आरोपी चिंट्याने तिला प्रलोभन देऊन थोडे दूर अंतरावर नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. त्याच्या तावडीतून सुटून ती रडतच घरी पोहोचली. त्यावेळी घटनेचा उलगडा झाला. त्या चिमुरडीने कन्हत आईला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने लगेचच दर्यापूर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी शनिवारी रात्री ११.१९ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला तातडीने अटक करण्यात आल्याची माहिती दर्यापूर ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक किरण औटे यांनी ‘लोकमत’ला दिली.