मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST2022-05-18T05:00:00+5:302022-05-18T05:00:50+5:30
राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचे आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यात मातंग समाजावरील वाढते अत्याचार तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोटांगण आंदोलनातून मातंग समाजाने सरकारवर रोष व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचे आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी या आंदोलनामध्ये डॉ. रूपेश खडसे, पंकज जाधव, गौरव गवळी, दादासाहेब क्षीरसागर, कैलास खंडारे, प्रकाश चमके, सचिन क्षीरसागर, हेमंत खंडारे, अनिल सोनटक्केसह शेकडो बांधव उपस्थित होते.
या आहेत मागण्या
राज्यातील मातंग समाजावरील वाढते अत्याचार थांबवा, अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये मागेल त्याला विनाजामीनदार कर्ज देण्यात यावे, डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, या मागण्या रेटून धरण्यात आल्या.
महाविकास आघाडीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचा आरोप आहे. आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.