एक पणती उजळू त्यांच्या दारी!

By Admin | Updated: November 11, 2015 00:06 IST2015-11-11T00:06:39+5:302015-11-11T00:06:39+5:30

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे.

One mercilessly brightens their door! | एक पणती उजळू त्यांच्या दारी!

एक पणती उजळू त्यांच्या दारी!

गजानन मोहोड अमरावती
‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे. दुष्काळ, नापिकी असली तरी दिवाळीची लगबग प्रत्येक घरी सुरू आहे. परंतु असेही काही कुटुूब आहेत, जिथे निरव शांतता आहे.
शोषित, वंचितांच्या घरात दिवाळीची पणती पेटण्याचीही स्थिती नाही. गावकुसाबाहेर पालात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये, झोपड्यांमध्ये एक पणतीदेखील पेटण्याची स्थिती नाही. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असणाऱ्या या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही. लोक साजरी करतात ती दिवाळी पाहायची आणि समाधान मानायचे, अशी स्थिती आहे. या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश केव्हा पोहोचणार? हा प्रश्नच आहे. यासाठी समाजमन जागृत होण्याची गरज आहे. वंचित अन् उपेक्षांच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या भटक्यांच्या हजारो पालांमध्ये, गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये गोडधोड तर दूरच साधी पणतीही दोन दिवसांत पेटलेली नाही. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही, हे वास्तव आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या गावांच्या आधाराने जीवन जगणाऱ्या आणि पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या कुटूंबात दिवाळीचा प्रकाश पोहोचण्याची सुतराम शक्यता नाही. भटक्यांसाठी दिवाळी येते आणि जाते ती कधीच साजरी केली जात नाही. त्यांना अंगभर कपडेही घालायला मिळत नाहीत. अभ्यंगस्रान, औक्षण, गोडधोड अन् रुचकर फराळ तर फार लांबची गोष्ट आहे. समाजातही विपरीत परिस्थिती आजही आहे, एकीकडे लख्ख प्रकाशाच्या दीपमाळा तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार अशा विरोधाभासात जिल्ह्यातील हजारो गावांत दिवाळी साजरी होत आहे.

पुढाकार घेण्याची गरज : वंचिताच्या वाट्याला येईल का रोषणाई?
- तर दिवाळी होईल हसरी

वंचिताच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी सुखवस्तू समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांच्या जीवनातील एक कोपरा प्रकाशमय करण्याचा संकल्प घेतला तर त्यांची दिवाळीदेखील हसरी होईल, प्रकाशमान होईल आणि हे दिल्याचे समाधान वेगळेच असते.

समाजऋण फेडण्याची हिच खरी संधी
दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करताना एखादा ड्रेस या वंचितांसाठीही घेता येतो. फटाक्यांची खरेदी करताना चारदोन फटाके त्यांच्यासाठीही ठेवता येतात. घरातील गोडधोड त्यांच्यासाठी थोडे काढता येईल. आपल्या घरात दिव्यांची आरास करताना त्यांच्याही पालात चार पणत्या लावता येतील. सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणाऱ्या संस्था व संवेदनशील व्यक्तींना हे सहज शक्य होऊ शकते, असे झाल्यास हीच खरी समाजऋणाची उतराई ठरेल.

Web Title: One mercilessly brightens their door!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.