अहो आश्चर्यम, साहेब हमको कोई तकलीफ नही !
By Admin | Updated: July 6, 2017 00:08 IST2017-07-06T00:08:05+5:302017-07-06T00:08:05+5:30
‘साहेब हमे कोेई तकलीफ नही’ मेळघाटातील आदिवासी महिलांनी उच्चारलेले हे शब्द ऐकून कुपोषणासाठी ...

अहो आश्चर्यम, साहेब हमको कोई तकलीफ नही !
कुपोषितांच्या पालकांचे आरोग्यमंत्र्यांसमोर मौन : दरवर्षी शेकडो बालके दगावतातच कशी ?
श्यामकांत पाण्डेय । लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : ‘साहेब हमे कोेई तकलीफ नही’ मेळघाटातील आदिवासी महिलांनी उच्चारलेले हे शब्द ऐकून कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या तसेच माता व बालमृत्युंचा शाप लाभलेल्या मेळघाटच्या दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्र्यांसह इतर अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कुपोषित मेळघाटातील मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील बालमृत्युचे वृत्त प्रकाशित होताच बुधवारी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मेळघाटला भेट दिली. त्यांनी धारणीपासून ५ किमी. अंतरावरील दिया, तलई व बासपानी गावात भेट देऊन आदिवासी महिलांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना समस्या कथन करण्यास सांगितले. मात्र, कुपोषित बालकांच्या मातांनी आरोग्यमंत्र्यांसमोर मौन धारण केले. आपल्याला कसलाच त्रास नसल्याचे त्रोटक उत्तर देऊन त्यांनी दस्तुरखुद्द आरोग्यमंत्र्यांची बोळवण केली. त्यांच्या या उत्तराने आरोेग्यमंत्री देखील अवाक झालेत. मेळघाटात दरवर्षी कुपोषणाच्या तांडवाने शेकडोंच्या संख्येने बालके दगावतात. इतकेच नव्हे तर मातामृत्युंची संख्याही वाढती आहे. येथील आरोग्यविषयक सुविधांचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. असे असताना दारात आलेल्या आरोेग्यमंत्र्यांसमोर आदिवासींनी घेतलेली भूमिका आश्चर्यात टाकणारीच आहे. आदिवासी महिला बोलण्यास घाबरत होत्या की गावातील अंगणवाडी आणि आरोग्यसेविकांसमक्ष त्यांनी मुद्दाम मौन बाळगले होते, हा प्रश्न चर्चिला जात होता. यावेळी आरोग्यमंत्र्यांसोबत खा. आनंदराव अडसूळ, सुधीर सूर्यवंशी होते. दिया, तलई आणि बासपानी गावाला आरोग्यमंत्र्यांनी आकस्मिक भेट दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. तलई गावातील हर्षित सतीश भिलावेकर या ४ वर्षीय मुलाची आदिवासी पाड्यात जाऊन आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली. अंगणवाडी केंद्रापासून हर्षितच्या घरापर्यंत चिखल तुडवित आरोेग्यमंत्री पोहोचले. हर्षित सध्या अतिकुपोषित श्रेणीमधून बाहेर आल्याचे अंगणवाडी सेविकेने सांगितले.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वप्रथम दिया गावाला भेट दिली. या गावात जाण्यासाठी फक्त ५ मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, रस्त्यांवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे त्यांना गावात पोहोचायला उशिर लागला. त्याचप्रमाणे तलईपर्यंत पोहोचताना आरोग्यमंत्र्यांचे पांढरे वाहन चिखलाने अक्षरश:माखले होते.
बासपानी गावातील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविकेसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांचेसमोर शेरेबुक ठेवण्यात आले. त्यावर दीपक सावंत यांनी ‘वेल, गूड’ असा शेरा लिहून स्वाक्षरी केली. येथे एकूण २० मुले असून यातील एकही मुल अतिकुपोषित श्रेणीमध्ये आढळले नाही, हे विशेष.
आरोग्यमंत्र्यांनी गावातील पाड्यात जाऊन खऱ्या समस्या शोधण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे त्यांनी शासकीय विश्रामगृहात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी समस्यांचे निवेदन आरोग्यमंत्र्यांना देण्यासाठी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते रांगेत उभे होते. स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मेळघाटातील आदिवासी त्यांच्या समस्या मांडण्यास धजावत नसल्याचा अनुभव यानिमित्ताने आरोग्यमंत्र्यांना आला.