अधिकारी- ठेकेदाराने हडपले १.८० कोटींचे तेलपंप, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 20:52 IST2019-01-12T20:52:12+5:302019-01-12T20:52:27+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथिल प्रदेशिक कार्यालयात तब्बल १.८० कोटी रुपयांचा अपहार उघड झाला आहे.

अधिकारी- ठेकेदाराने हडपले १.८० कोटींचे तेलपंप, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
- पंकज लायदे
धारणी (अमरावती) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी येथिल प्रदेशिक कार्यालयात तब्बल १.८० कोटी रुपयांचा अपहार उघड झाला आहे. आदिवासी बांधवांना सिंचनासाठी मंजूर तेलपंप न देता ती रक्कम तत्कालीन अधिकारी कर्मचारी व ठेकेदारानेच गिळंकूत केले. याप्रकरणी धारणी कार्यालायातील दोन तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापकांसह दोन कर्मचारी व एका ठेकेदाराविरुद्ध धारणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री १२च्या सुमारास गुन्हा दाखल केला. सन २००४ ते २००९ या कालावधीत हा अपहार करण्यात आला.
तत्कालिन प्रादेशिक व्यवस्थापक शाम नारायण मुंड व पी. आर. वाघमारे, नामदेव नथ्थुजी मेश्राम, चंद्रकांत भलावी व आकाश दिप विद्यूत कामगार सरकारी संस्था नंदुरबारचे ठेकेदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धारणीचे विद्यमान प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलकर यांनी ही तक्रार नोंदविली.
एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत आदिवासी बांधवाना गॅस यूनिट व तेलपंप मोफत वितरित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या अखत्यारितील प्रादेशिक व्यवस्थापक धारणी यांच्याकडे होती. त्यानुसार येथिल प्रदेशिक कार्यालयास आदिवासी बांधवाना वितरित करण्यासाठी २२०९ तेलपंप प्राप्त झाले. सिंचनासाठी जनरेटरप्रमाणे काम करणाºया या तेलपंपामुळे आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येणार होते. मात्र धारणी प्रादेशिक कार्यालायात त्या कालावधीत कार्यरत चारही लोकसेवकांनी ठेकेदारशी संगणमत करुन एकृर तेलपंपापैकी ९१३ तेलपंपाचे वितरणच केले नाही. १ कोटी ८० लाख ७५ हजार १७ रुपये किमतीच्या त्या तेलपंपांचा अपहार केला.
चौकशी अहवालानंतर तक्रार
९१३ आदिवासी बांधवाना तेलपंप वाटप करण्यात आले नसल्याच्या तक्रारी शासन दरबारी करण्यात आल्या होत्या. या अपहाराच्या चौकशीसाठी राज्यशासनाने गायकवाड समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाअंती सन २००४ ते २००९ या कालावधीतील प्रादेशिक व्यवस्थापकासह कर्मचारी व एका ठेकेदारास दोषी ठरविण्यात आले.
शुक्रवारला उशिरा रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. २२०९ तेलपंपापैकी ९१३ तेलपंपाचे वितरण न करता त्या रकमेचा अपहार करण्यात आल्याची तक्रारीत नोंद आहे.
विलास कुलकर्णी, ठाणेदार, धारणी पोलिस ठाणे