चिखलदरा (अमरावती) : मेळघाट वनविभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत थेट एनटीसीएकडून एका वनरक्षकाला ‘वाघ रक्षक’ पुरस्कार जाहीर झाला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गौरवात त्यांनी मानाचा तुरा खोवला आहे.
मोनिका चौधरी (३१) यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. योगशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एमए केले. २०११ ला वनविभागामध्ये त्या रुजू झाल्या. अत्यंत दुर्गम असलेल्या धूळघाट क्षेत्रात कार्य केल्यानंतर सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मेळघाट वन्यजीव विभागातील दुर्गम जामली वनपरिक्षेत्रातील गिरगुटी या डोंगर नियतक्षेत्रात त्या कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करताना त्यांनी गिरगुटी गावामध्ये असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती व गावकरी यांना सोबत घेऊन वनसंरक्षण व संवर्धनासंबंधी उत्तम कार्य केले. यामध्ये १०० टक्के एलपीजी सिलिंडर वाटप करून जंगलातील वृक्षतोड लोकसहभागातून पूर्णपणे बंद केली. या वन्यजीव क्षेत्रात असलेले ३५ हेक्टर अतिक्रमणसुद्धा स्थानिक लोकांना सोबत घेऊन काढले, हे विशेष. या क्षेत्रात वन्यजिवांची रेलचेल आता दिसून येत आहे. याशिवाय या गावांमध्ये वन्यजिवांसाठी कुरण विकासाचेही उत्तम कार्य करून वनांतील प्राण्यांना संजीवनी दिली. याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फायदा मानव प्राणी संघर्ष कमी होण्यासाठी झाला आहे. मोह वृक्षाची नर्सरी करून दहा हजार रोपे लोकांना त्यांच्या शेतामध्ये लावण्याकरिता दिले, ज्यामधून भविष्यात त्यांना उत्पादन प्राप्त होईल. वाघांचा व वन्यजिवांचा अधिवास समजून घेण्यासाठी जंगलामध्ये प्रेशर इम्प्रेशन पॅड तयार केले. नियमित वनगस्तीदरम्यान २०२०-२१ मध्ये साधारणत: २६६४ किमी गस्त केली व वन्यजिवांची अभ्यास पूर्ण माहिती संकलित केली.
मानचिन्ह व एक लाख रुपये रोख असे बक्षिसाचे स्वरूप आहे. वनरक्षक मोनिका चौधरी यांच्या यशाचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनअधिकारी पीयूषा जगताप यांनी कौतुक केले.