वाघांच्या वाढीव आकडेवारीवर ‘एनटीसीए’चे लक्ष, प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 18:22 IST2018-03-19T18:22:36+5:302018-03-19T18:22:36+5:30
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली.

वाघांच्या वाढीव आकडेवारीवर ‘एनटीसीए’चे लक्ष, प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट
अमरावती : राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी वन्यजीव गणना पार पडली. मात्र, व्याघ्र प्रकल्पांकडून देहरादून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेला पाठविलेल्या वाघांच्या आकडेवारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) बोट ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पांचे पहिल्यांदाच सुरक्षा आॅडिट होत असून, एनटीसीए, एमईई चमूकडून पाहणी करण्यात आली आहे.
दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. परंपरागत आणि नव्या प्रणालीचा वापर करून व्याघ्रांची संख्या निश्चित होते. त्याअनुषंगाने ताडोबा, पेंच, मेळघाट, बोर, टिपेश्वर व सह्यांद्री या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वन्यजीव गणनेनंतर हाती आलेल्या संख्येनुसार ही आकडेवारी देहरादून येथे अहवालाद्वारे पाठविली. परंतु, व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालकांनी व्याघ्रांची आकडेवारी फुगवून पाठविल्याने एनटीसीएच्या अधिकाऱ्यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे राज्यात व्याघ्र प्रकल्पांच्या सुरक्षेच्या आढावा घेण्याच्या नावे व्याघ्रांची संख्या वास्तविक वाढली काय, हे बघण्यासाठी मध्य व दक्षिण विभागात स्वतंत्र चमू व्याघ्र प्रकल्पांची पाहणी करीत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवार, १६ मार्चपासून एनटीसीए, एमईई (मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन) अशा दोन स्वतंत्र पथकांनी सिपना, गुगामल, अकोट वन्यजीव विभागात वाघांबाबतचे बारकावे तपासले आहे. वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, कर्मचारी वर्ग, शिकार रोखण्यासाठी प्रतिबंधक कार्यवाही, राखीव वनांत अतिक्रमण आदी बाबींवर या चमूने भर दिल्याचे व्याघ्र प्रकल्पातील एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अशी पाठविली व्याघ्रांची आकडेवारी
देहरादून येथील राष्ट्रीय वन्यजीव संस्थेच्या निर्देशानुसार वन्यजीव गणना करण्यात आली. यात गणनेनंतर राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांनी वाघांची संख्या निश्चित करून ती आकडेवारी केंद्र सरकारकडे पाठविली आहे. यात ताडोबा १३० ते १५५, मेळघाट ५५ ते ६०, पेंच ५० ते ५५, टिपेश्वर ५ ते ८, सह्याद्री १५ ते २० अशी वाघांची संख्या असल्याचे अहवालात नमूद आहे.
यावर्षीच व्याघ्र प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट का?
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियंत्रणात त्यांचा कारभार चालतो. वाघांच्या संख्यावाढीसाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी व्याघ्र प्रकल्पांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. परंतु, काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्याघ्र गणनेनंतर पाठविलेल्या वाघांच्या संख्येवर एनटीसीएने लक्ष केंद्रित केले आहे. व्याघ्र प्रकल्प स्थापन होऊन ३५ ते ४० वर्षांचा कालावधी झाला असताना, आतापर्यत सुरक्षा आॅडिट झाले नाही; यावर्षीच सुरक्षा आॅडिट का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.