आता वाढणार पुनर्वसूच्या कोल्ह्याचा धुमाकूळ
By Admin | Updated: July 5, 2016 00:51 IST2016-07-05T00:51:42+5:302016-07-05T00:51:42+5:30
जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वदूर सार्वत्रिक पाऊस पडला आहे. मंगळवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे.

आता वाढणार पुनर्वसूच्या कोल्ह्याचा धुमाकूळ
सार्वत्रिक पाऊस : सर्वच तालुक्यांत पेरणीला वेग
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वदूर सार्वत्रिक पाऊस पडला आहे. मंगळवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत आहे. या नक्षत्रात पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे. नंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दक्षिण गुजरातपासून केरळच्या उत्तर किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थितीचा प्रभाव कायम राहिल्याने विदर्भात पावसाने यंदा प्रथमच सरासरी गाठली. पुढील २४ तासांत म्हणजेच ५ जुलैपर्यंत जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा नागपूर हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होत जाणार आहे. मात्र, मध्यम स्वरूपाचा पाऊस महिन्याच्या अखेरपर्यंत राहणार आहे. ५ ते १५ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा व १५ ते २५ जुलैदरम्यान पाऊस कमी राहल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान जिल्ह्यात १ ते ४ जुलैपर्यंत पावसाची १८१.७ मिमी सरासरी अपेक्षित असताना २३०.७ मिमी पाऊस पडला. ही टक्केवारी १२७ टक्के आहे. ४ जुलै रोजी अमरावती शहरासह ग्रामीण भागात ११ मि.मी. पाऊस पडला. सर्वाधिक ४३.१ मिमी पाऊस मोर्शी येथे पडला. नांदगाव २२.७, तिवसा १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
११७० शेतकऱ्यांच्या तीन हजार हेक्टर पिकांचे नुकसान
जिल्ह्यात शनिवारी व रविवारी आलेल्या जोरदार पावसामुळे अचलपूर तालुक्यामधील नदी-नाल्यांना पूर आला. यामध्ये मौजा येसुर्णा, खानापूर, चिंचखेड, टोंगलाबाद, खानापूर, सावळापूर, सावळी येथील २३५ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. दर्यापूर तालुक्यात वाघाडी, चांदई, खोलनागवे, आटाळ, माटरगाव, गौरखेडा, बेंबळा, दारापूर या गावांमधील ८२० शेतकऱ्यांच्या ४०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. चिखलदरा तालुक्यात सत्तीरूई फाटा नदीला पूर आल्यामुळे ३० शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे जिल्ह्यात एकूण १,१७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दोन व्यक्ती पुरात वाहून गेली
रविवारी पेढी नदीला आलेल्या पुरामुळे भातकुली येथील निखिल मनोहर पंचबुद्धे (२२) हा युवक वाहून गेला. त्याचा मृतदेह सोमवारी सकाळी मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथे आढळून आला. तसेच मोर्शी येथे नळा नदीला आलेल्या पुरामुळे चिनाबाई देवराव कुमरे ही ६० वर्षीय महिला वाहून गेली.