‘नोटा’ बंदीचा संत्रा उत्पादकांना फटका

By Admin | Updated: November 18, 2016 00:21 IST2016-11-18T00:21:03+5:302016-11-18T00:21:03+5:30

केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे.

'Nota' ban on orange growers | ‘नोटा’ बंदीचा संत्रा उत्पादकांना फटका

‘नोटा’ बंदीचा संत्रा उत्पादकांना फटका

व्यवहार गोत्यात : खरेदीअभावी शेतकऱ्यांवर अरिष्टे, हमीभाव देण्याची मागणी
अमरावती : केंद्र सरकारने हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. संत्रा व्यापाऱ्यांसोबत यापूर्वी झालेले व्यवहार गोत्यात आले आहे. हल्ली संत्रा मातीमोल दरात खरेदी केला जात आहे. शेतक ऱ्यांवरील आरिष्ट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी संत्रा उत्पादकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर धाव घेऊन आपबिती कथन केली.
निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्याशी चर्चा करताना संत्रा उत्पादकांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी रेटून धरली. सध्या आंबिया बहर संत्रा तोडीचा हंगाम सुरु झाला आहे. यापूर्वी मोहन पावडे, मनीष देशमुख, किशोर चांगोले यांनी संत्रा व्यापाऱ्यांंसोबत केलेले व्यवहार हजार, पाचशेच्या नोटा बाद झाल्यामुळे ते गोत्यात आले आहे. यावेळी संत्र्यांचे उत्पादन चांगले असताना आता हजार, पाचशेच्या नोटा बंदच्या निर्णयामुळे संत्रा उत्पादकांवर आरिष्टे कोसळले आहे. बाजारात संत्र्याला खरेदीदार नाही. व्यापारी अतिशय कमी दरात व्यवहार करीत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ३० ते ३२ हजार रुपये प्रति टन दर असलेला संत्रा आता व्यापारी १४ ते १८ हजार रुपये दराने खरेदीची मागणी करीत आहे. एकूणच संत्रा उत्पादक हताश झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी मोहन पावडे यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना बुधवारी निवेदन देऊन पुढाकार घेण्याची विनंती केली होतीे. त्यानुसार संत्राउत्पादकांवर आलेले आरिष्ट दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा उत्पादकांची बैठक घेण्याच्या सूचना आरडीसी पातुरकर यांना दिल्या. त्यानुसार गुरुवारी ही बैठक पार पडली. संत्रा उत्पादकांवर आलेले संकट दूर करण्यासाठी नवीन चलन उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांवर आरडीसी यांनी तोडगा काढण्याची ग्वाही दिली. यावेळी मोहन पावडे, मनीष देशमुख, किशोर चांगोले, रमेश जिचकार, सचिन खोले, प्रवीण इंगळे, नितीन राऊत, रवी पाटील, देवेंद्र गोरडे, विजय खेरडे, पुरुषोत्तम भेले उपस्थित होते.

संत्रा खरेदी-विक्रीचे व्यवहार विश्वासावर
संत्रा खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार हे विश्वासावर चालतात. संत्रा खरेदीदार व्यापारी हे संत्रा तोडीपूर्वी ५० टक्के रक्कम देतात आणि तोडीनंतर ५० टक्के रक्कम देतात. पंरतु जुने चलन बंद करण्याचा निर्णय हा संत्रा उत्पादकांच्या मुळावर घाला घालणारा ठरत आहे. संत्रा खरेदीदार व्यापारी हे परप्रांतीय असल्यामुळे ते धनादेशाद्वारे व्यवहार करण्याचे शब्द देत आहेत. मात्र परप्रांतीय संत्रा खरेदीदार व्यापाऱ्यांवर कसा विश्वास ठेवावा, असा सवाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. या व्यवहारात फसवणुकीची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: 'Nota' ban on orange growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.