मेळघाटात एक नव्हे, अनेक वाघांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 08:21 PM2018-12-08T20:21:44+5:302018-12-08T20:22:53+5:30

मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत.

Not one in Melghat, many tigers hunted | मेळघाटात एक नव्हे, अनेक वाघांची शिकार

मेळघाटात एक नव्हे, अनेक वाघांची शिकार

googlenewsNext

- अनिल कडू

परतवाडा, (अमरावती) : मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत.
या शिकारींच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी तसेच शिकार प्रतिबंधक विभागाकडे माहिती प्राप्त झाली आहे. आरोपींकडून मिळत असलेल्या मौखिक माहितीच्या आधारे वाघांसह वन्यजीवांच्या शिकारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत गिरगुटी परिसरातही या शिकारीच्या घटना घडू लागल्या आहेत. पूर्वमेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक प-हाड यांच्या नेतृत्वात तपास पथके घडलेल्या घटनांचा मागोवा घेत आहेत. काही आरोपींनाही त्यांनी ताब्यात घेतले असून युद्धस्तरावरील या चौकशीत काही गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. एका ठिकाणावरून संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. तर तीन आरोपींना नव्याने अटक केली आहे.
प्रादेशिक वन विभागाचे डिएफओसुद्धा शुक्रवारी चिखलद-याकडे रवाना झाले असून नव्याने अटक केलेल्या आरोपींनाही चिखलद-यात ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. आरोपी जी जागा दाखवतात ती खोदून बघितली जात आहे. आतापर्यंत जंगलात चार ते पाच ठिकाणी खोदण्यात आले असले तरी वाघाचे कुठलेही अवयव त्या ठिकाणी चौकशी अधिका-यांच्या हाती लागलेले नाहीत. दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे.
वाघाने मारलेल्या पाळीव जनावरांसह अन्य वन्यजीवांवर विषप्रयोग करून आणि काही वेळा पाणवठ्यातील पाण्यात विष टाकून आरोपींनी या शिकारी केल्या आहेत. या शिकारीच्या अनुषंगाने पूर्वमेळघाट वनविभागांतर्गत येत असलेले गिरगुटी गाव प्रकाशझोतात आले आहे. या गिरगुटी जंगलाला लागूनच व्याघ्र प्रकल्पाचे संवेदनशील क्षेत्र आहे. या संवेदनशील क्षेत्रातील कोहा, कुंड या गावाचे पुनर्वसन झाले आहे. मनुष्यविरहीत या क्षेत्रात वाघ, बिबटसह अन्य वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. या मुक्तसंचारातच काही वन्यजीव, वाघ, बिबट गिरगुटी जंगलात भ्रमंतीस असताना शिकार करणा-यांच्या नजरा त्यांच्यावर पडल्यात आणि वन्यजीव मारले गेल्याचे बोलले जात आहे.
गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोदकुमार शिवकुमार यांच्याशी संपर्क साधला असता पूर्ण चित्र स्पष्ट व्हायला अजून दोन ते तीन दिवस लागतील. यानंतरच माहिती देता येईल, असे ते म्हणालेत.
वाघ, बिबट शिकार घटना चौकशीत असून अजूनपर्यंत या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान नेमके किती वाघ, किती बिबट मारल्या गेलेत याची माहिती अधिकारी जेव्हा खुलासा करतील तेव्हाच पुढे येईल.

Web Title: Not one in Melghat, many tigers hunted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.