उच्च शिक्षण विभागाचा फडणवीस सरकारला धक्का; अशासकीय समित्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:55 IST2020-01-30T17:54:54+5:302020-01-30T17:55:53+5:30
फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या.

उच्च शिक्षण विभागाचा फडणवीस सरकारला धक्का; अशासकीय समित्या रद्द
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, योजनांमध्ये बदल अथवा ते रद्द करीत आहेत. त्याअनुषंगाने आता उच्च शिक्षणातील गठित अशासकीय समित्या रद्द करण्यात आल्या आहेत.
फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या. या समित्यांवर शासकीय सदस्यांसोबत अशासकीय सदस्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कारभार स्वीकारला. तथापि, फडणवीस यांनी घेतले निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द केले जात आहेत. याचा फटका उच्च व तंत्र शिक्षण विभागात गठित १२ अशासकीय समित्यांना बसला आहे. रद्द करण्यात आलेल्या अशासकीय समित्यांचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्यांचा समावेश असलेला शासननिर्णय २४ जानेवारी २०२० रोजी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.
‘या’ रद्द झाल्यात अशासकीय समित्या
* नवीन राष्ट्रीय धोरण निश्चितीसाठी कार्यबल गट
* उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणासाठी सल्लागार समिती
* रूसा अंतर्गत गुणवत्ता हमी सेल
* योग शिक्षणाचे धोरण निश्चिती समिती
* राज्याच्या उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणासाठी कार्यबल गट
* स्टार्टअप पॉलिसी ठरविणारी समिती
* समूह विद्यापीठ अधिनियम, २०१८ मसुद्यावर चर्चेसाठी तज्ज्ञ समिती
* अभ्यासक्रम, विषय विद्याशाखा, तुकड्यांची तपासणी समिती
* फर्ग्युसन विद्यापीठ अध्यादेश, २०१९ चा मसुदा अंतिम तज्ज्ञ समिती
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती
* महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती
* राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती