लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचे आयुर्मान संपल्याचे रडगाणे गाणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहेत. अलीकडे ना भारनियमन, ना जलवाहिनी फुटली तरीही सहा दिवसांनी पाणीपुरवठा करण्याचा डाव अधिकारी रचत आहेत. तर दुसरीकडे मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणात ५२ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे.
मजीप्रात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा लवाजमा असताना अमरावतीसह बडनेरा शहरात गत काही महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठ्याला फाटा दिला जात आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याचा वापर वाढतो, हे सर्वश्रुत आहे. याचा बागुलबुवा करून मजिप्राचे अभियंते जबाबदारीतून हात झटकत असल्याचे दिसून येते. नियमित पाणीपुरवठा करू अशी शेलकी मिरवणारी मजिप्राचे अभियंते आता सहा दिवसांनी पाणीपुरवठा करीत असल्यामुळे ते कसे कर्तव्य बजावत आहे, हे दिसून येते. अप्पर वर्धा धरणातून मुख्य जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणी ओढले तर ती फुटेल असा स्वतःहूनच अंदाज मजिप्राचे अभियंते बांधत आहेत. तथापि, पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याऐवजी दिवसाआड तर दूरच आता सहा दिवसांनी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
दरवर्षीच येतो उन्हाळा...उन्हाळ्यात कुलर, झाडांना पाणी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर वाढल्याचे अधिकारी सांगतात. मात्र, उन्हाळा हा दरवर्षीच येतो, याचा विसर या अभियंत्यांना पडल्यानेच यंदा सहा दिवसांनी पाणीपुरवठ्याचा प्रताप मजिप्राने केला आहे.
पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक केव्हा?अमरावती, बडनेरा शहरांत मजिप्राकडून पाणी पुरवठ्याचे नियोजनच नाही. कधी रात्री १२, तर कधी १ वाजतानंतर पाणीपुरवठा केला जातो. वेळापत्रक निश्चित नाही. अवेळी पाणीपुरवठ्याने सर्वांचे हाल होत आहेत.
आमदार, खासदारांनी द्यावे लक्षउन्हाळात नागरिकांची पाणीपुरवठ्याची मागणी पूर्णत्वासाठी आता आमदार, खासदारांना लक्ष द्यावे लागेल, अशी स्थिती आहे. अवेळी पाणीपुरवठा, विशिष्ट भागातच नियमित पाणी देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लागेबांधे, निरंकुश कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवर घालावा लागणार आहे
अमृत योजनेच्या पूर्णत्वास अडीच वर्षे लागणारमंजूर झालेल्या अमृत योजना टप्पा-२ या पूर्णत्वास जाण्यास किमान दोन ते अडीच वर्षे लागणार आहेत. या योजनेत जलवाहिनीचे नवीन स्टील पाइप अंथरले जाणार आहेत. नव्याने जलशुद्धीकरण केंद्र, नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिनी, जलकुंभसाकारले जाणार आहेत.
"दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे."- संजय लेवरकर, उपकार्यकारी अभियंता, मजिप्रा.