आधार सिडिंग न केल्यास धान्य नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:45+5:302021-01-08T04:38:45+5:30
अमरावती : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल केशरी शेतकरी योजनेच्या जिल्ह्यातील २३ लाख ७६ हजार ७८१ लाभार्थ्यांपैकी १९ लाख ...

आधार सिडिंग न केल्यास धान्य नाही!
अमरावती : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल केशरी शेतकरी योजनेच्या जिल्ह्यातील २३ लाख ७६ हजार ७८१ लाभार्थ्यांपैकी १९ लाख ५५४ लाभार्थ्यांचे आधारकार्ड सिडिंग झाले आहे. त्यामुळे योजनेतील ३ लाख ९९ हजार २२७ लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांक सेटिंग १०० टक्के करण्याचा आदेश केंद्र शासनाने दिला आहे. त्यामुळे आता आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांसाठी शासनाने ३१ जानेवारीपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहेत. त्यामध्ये आधार सिडिंग न केल्यास लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याचा आदेशही दिला आहे.
आधार सिडिंगची कार्यवाही रास्त धान्य दुकानदार करणार आहेत. १जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. अंत्योदय, एपीएल शेतकरी व प्राधान्य कुटुंबातील ज्या लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल क्रमांक जोडले नाहीत, अशा लाभार्थ्यांनी संबंधित दुकानदारांकडे असलेल्या ई पॉस मशीनद्वारे त्यांचे आधार सिडिंग व मोबाईल क्रमांक जोडून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व एपीएल केशरी शेतकरी योजनेच्या जवळपास १९ लाखांवर लाभार्थ्यांचे आधार सिडिंग झाले आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक सिडिंग करून घ्यावेत, अन्यथा धान्य मिळणार नाही. त्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सेटिंग सुधारणे आवश्यक आहे. यासाठी रास्त धान्य दुकानातील ई पास उपकरणांमध्ये ई केवायसी व मोबाईल सेटिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडिंगचे प्रमाण वाढवले जाणार आहे. ३१ जानेवारीपूर्वी प्रत्येक वरील प्रक्रिया करून घेण्यासाठी नागरिकांनी पुरवठा विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोट
३१ जानेवारीपर्यंत आधार सिडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे धान्य आधार सेडिंग होत नाही तोपर्यंत मिळणार नाही. नागरिकांनी त्वरित आधार सिडिंग करून घ्यावे तसेच होणारी गैरसोय टाळावी.
अनिल टाकसाळे
जिल्हा पुरवठा अधिकारी अमरावती