-तर नव्या नोटा स्वीकारण्यासही नकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:24 IST2016-12-26T00:24:22+5:302016-12-26T00:24:22+5:30
पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा

-तर नव्या नोटा स्वीकारण्यासही नकार !
आरबीआयची अधिसूचना : नोटांवर लिहिणे पडणार महागात
अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर पाचशे व दोन हजारांच्या नव्या नोटा नागरिकांना वितरीत करण्यात आल्यात. मात्र, या नवीन नोटांवर काही लिहिलेले किंवा स्टॅपल केले असल्यास त्या नोटाच बँकांकडून स्वीकारल्या जाणार नाहीत. अशी अधिसूचनाच भारतीय रिजर्व बँक आॅफ इंडियातर्फे काढण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन नोटांवर काही लिहून ठेवणे नागरिकांना महागात पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला जुन्या पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभरातील नागरिकांची ताराबंळ उडाली. या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सुरूवातीच्या दिवसांत जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी स्पर्धाच लागली होती. प्रत्येकांनी जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली. यानोटाबंदीचा अनेकांना त्रास सहन करावा लागला. बँकातून पैसे काढण्यासाठीही नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. आता ती स्थिती बदलली असून बँका व एटीएमसमोरील गर्दी सुद्धा कमी झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी सुरळीत झाले आहेत.
आता नव्या नोटांवर आर्थिक व्यवहार सुरू झाले असून गोळा झालेल्या नवीन नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, नव्या नोटांवर पेन अथवा स्केच पेनद्वारे काही लिहिले असल्यास त्या नोटा बँकांकडून स्वीकारण्यात येणार नसल्याची अधिसूचना आरबीआयने काढली आहे. त्यामुळे नव्या नोटांवर काही लिहिण्याचे प्रयत्न नागरिकांनी करू नयेत, असे संबंधित बँकांकडून खातेदारांना सांगण्यात येत आहे. देवरणकरनगरातील बँक आॅफ इंडियामध्ये सुरक्षारक्षकच रांगेतील नागरिकांना नोटांवर काही लिहू नका, अन्यथा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशा सूचना देत आहे. त्यामुळे नवीन नोटा बाळगताना नागरिक कमालीचे जागरूक असल्याचे दिसत आहेत. हा एक चांगला संकेत आहे.
२ हजार कोटींच्या
जुन्या नोटा गोळा
जिल्ह्यातील ३३१ बँकांमध्ये गोळा झालेल्या पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा आता दोन हजार कोटींपर्यंत पोहोचल्या आहेत. आता जुन्या नोटा बँकामध्ये जमा करण्याचे प्रमाण कमी झाले असून अजुनही जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या जात आहेत. डेडलाईन जसजसी जवळ येत आहे, तशी नोटा जमा करण्याची लगबग वाढली आहे.