"त्याला अध्यक्ष करायच्या आधी माझा राजीनामा घ्या", नितीन गडकरींनी सांगितला मुलाबद्दलचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 16:38 IST2025-03-22T16:37:11+5:302025-03-22T16:38:40+5:30
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुले राजकारणात न येण्याबद्दल भाष्य केलं. त्यांच्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव आला होता. पण, त्याला गडकरींनी नकार दिला. काय घडलं होतं, याबद्दलचा किस्सा गडकरींनी सांगितला आहे.

"त्याला अध्यक्ष करायच्या आधी माझा राजीनामा घ्या", नितीन गडकरींनी सांगितला मुलाबद्दलचा किस्सा
Nitin Gadkari News: 'माझ्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचं आहे. असे एकदा मला प्रवीण दटके यांनी विचारलं होतं. त्यावर मी त्यांना म्हणालो की, त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा घेऊन टाका.' हे विधान आहे केंद्रीय नितीन गडकरी यांचे! अमरावतीमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी त्यांची मुले राजकारणात नसल्याबद्दलचा किस्सा सांगितला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमरावतीलमधील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना राजकारणाबद्दल भाष्य केले.
आधी माझा राजीनामा घेऊन टाका, असे गडकरी का म्हणाले?
नितीन गडकरी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "मी व्यावसायिक नाहीये. मला व्यवसायही करायचा नाही. मी जे काही केले, ती घाट्याची (तोट्यातील) कामे केली असतील, पण मुलांनी फायद्याची केली. माझी मुलं राजकारणात नाहीत. कारण मला... मी एकदा घरात विषय आल्यावर त्यांनी मला विचारलं... प्रवीण दटके आता आमदार आहेत. त्यांनी मला एकदा विचारलं की, तुमच्या मुलाला आता युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचं आहे. मी म्हणालो चांगली गोष्ट आहे. त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा घेऊन टाका आणि मग त्याला करा. ते म्हणाले, तुम्ही असं कसं म्हणता. मी म्हणालो, मला मान्य नाही."
"ते काम माझ्या मुलाने करावे"
"माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल, हे नाही. त्याने आपल्या कर्तृत्वाने आपलं स्थान निर्माण करावं. मग त्याला तुम्ही घ्या. मी सायकल रिक्षातून उद्घोषणा केल्या. पोस्टर चिकटवले. आणि शून्यातून काम केले. त्याने ते काम करावं. माझा मुलगा म्हणून नाही", अशी भूमिका गडकरींनी यावेळी मांडली.
आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे -गडकरी
"त्याला लोकांनी म्हणावं की हा पाहिजे. माझा मुलगा म्हणून तो पुढे बसले माझ्या हे नाही करायचं. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे. खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. त्याला अधिकार आहे, आमदार-खासदाराने म्हणायच्या ऐवजी जनतेने जर म्हटलं... कार्यकर्त्यांनी म्हटलं तर त्यांना अधिकार आहे. जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात, त्यांना अधिकार आहे", असे गडकरी यावेळी राजकारणातील घराणेशाहीबद्दल बोलताना म्हणाले.