शाळेची भिंत कोसळून नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:36+5:30

तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली.

Nine injured when school wall collapses | शाळेची भिंत कोसळून नऊ जखमी

शाळेची भिंत कोसळून नऊ जखमी

ठळक मुद्देकुरवाडे कुटुंब झोपेत असतानाच घडला अपघात, अंगावर पडले टीनपत्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी :  तालुक्यातील उदखेड येथील जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत त्यालगत राहणाऱ्या कुरवाडे यांच्या घरावर पडली. त्यामुळे झोपेतच असलेले नऊ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्यात दबलेल्या लोकांना बाहेर काढल्याने अनुचित घटना टळली.
कुरवाडे कुटुंब झोपेत असतानाच शिकस्त झालेली भिंत घरावर कोसळली. नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (६५), मुले गजानन (३४) व मंगेश (३१), सुना अंबिका (३०) व सूर्यकांता (२६), व नातू साक्षी (१४), श्रेया (१२), सोनाली (९) व आर्यन (६) हे ढिगाऱ्याखाली दबून किरकोळ जखमी झाले. त्यापैकी मंगेश हा टिनाखाली दबल्याने जखमी झाला. मोहन अढाऊ, किशोर पाटील, मनोहर कुरवाडे यांनी जखमींना मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केला. मात्र, नऊही रुग्णांना किरकोळ मार लागल्याचे स्पष्ट करण्यात आले. 
घटनेची माहिती मोहन अढाऊ यांनी आ. देवेंद्र भुयार यांना दिली. मोर्शीचे प्रभारी तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. 

ठरावाची अंमलबजावणी नाही
सरपंच धनराज राठोड यांच्या नेतृत्वात १५ मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृहात शाळेची भिंत डिसमँटल झाल्याचा ठराव घेतला. तो पंचायत समितीकडे पाठविण्यात आला. भिंतीचे नव्याने बांधकाम करण्याविषयी कागदोपत्री कार्यवाही सुरू असताना अचानक भिंत कोसळली.

जिल्हा परिषदेच्या ४०० शाळांच्या परिपूर्ण बांधकाम प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. निधीदेखील मंजूर झाला आहे. बांधकाम संबंधित विभागाकडून कार्यवाही अपेक्षित आहे. किती शाळा झाल्या, हे सांगू शकत नाही. 
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

पाऊस ठरले कारण
मोर्शी तालुक्‍यात तीन दिवसांपूर्वी पावसाचे आगमन झाले. जिल्हा परिषद शाळेची कुंपणभिंत जर्जर झाली होती. ती केव्हाही कोसळेल, असा अंदाज बरेच दिवसांपासून व्यक्त केला जात होता. याबाबत कुरवाडे कुटुंबाने ग्रामपंचायतीला कळविलेदेखील होते. अखेर उदखेड शिवारात दोन दिवसांपासून कोसळत असलेला पाऊस भिंत कोसळण्यास कारणीभूत ठरला.

 

Web Title: Nine injured when school wall collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.