नायलॉन मांज्याने शिक्रा, वटवाघूळ मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:19 IST2018-09-29T22:19:09+5:302018-09-29T22:19:25+5:30
नॉयलॉन मांज्यात अडकून शिक्रा व वटवाघूळ दगावल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात उघडकीस आली. नॉयलॉन मांज्यावर बंदी असतानाही शहरात मांज्याची विक्री राजरोस सुरू आहे.

नायलॉन मांज्याने शिक्रा, वटवाघूळ मृत्युमुखी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नॉयलॉन मांज्यात अडकून शिक्रा व वटवाघूळ दगावल्याची धक्कादायक घटना नुकतीच शहरात उघडकीस आली. नॉयलॉन मांज्यावर बंदी असतानाही शहरात मांज्याची विक्री राजरोस सुरू आहे.
गत आठवड्यापासून वसाच्या अॅनिमल्स रेस्क्युअरनी मांज्यात अडकलेल्या ४ पक्ष्यांचा रेस्क्यू केला. यामध्ये गाय बगळा, जंगली कबुतर, शिक्रा आणि वटवाघूळ यांचा समावेश होता. वसाचे गणेश अकर्ते, पुरुषोत्तम डोंगरे, रोहित रेवाळकर, रीतेश हंगरे, मुकेश वाघमारे आणि निखिल फुटाणे यांनी नायलॉन मांज्यातून पक्ष्यांची सुटका केली. शहारीत वेगवेगळ्या ठिकाणाहून रेस्क्यू केलेल्या या पक्ष्यांवर जिल्हा वैद्यकीय सर्व पशू चिकित्सालयात डॉ. कळमकर, डॉ. हटकर आणि डॉ. कुलकर्णी तसेच वैद्यकीय सहायक प्रेम पवार, प्रवीण नवरंगे, कोकाटे यांनी उपचार केले. गाय बगळा व जंगली कबुतर हे उपचारानंतर निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले. मात्र, वटवाघूळ आणि शिक्रा पक्ष्याला प्राणास मुकावे लागले. नॉयलॉन मांजा नागरिकांसह पक्षी-प्राण्यांसाठी जीवघेणा ठरतो. त्यामुळे नॉयलॉन मांज्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालावा, यासाठी वन्यप्रेमी प्रयत्नरत आहेत.