...अखेर इर्विनच्या शवविच्छेदनगृहात पोहोचला फ्रीजर, एसीही झाले सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 13:15 IST2022-05-10T13:07:15+5:302022-05-10T13:15:42+5:30
चार दिवसांमध्ये या शवविच्छेदनगृहात नवीन फ्रीजर बोलाविल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी दिली.

...अखेर इर्विनच्या शवविच्छेदनगृहात पोहोचला फ्रीजर, एसीही झाले सुरू
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील शवविच्छेदनगृहातील मृतदेह ठेवण्यासाठी असलेले सर्वच फ्रीजर बंद असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित केली. या बातमीनंतर अखेर आरोग्य यंत्रणेला जाग आली असून, तातडीने नांदगाव खंडेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक फ्रीजर आणून शवविच्छेदनगृहात लावण्यात आला आहे. तसेच मृतदेह ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था असलेल्या एसी रूममधील बंद एसीदेखील सुरू केले आहेत. तसेच चार दिवसांमध्ये या शवविच्छेदनगृहात नवीन फ्रीजर बोलाविल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी दिली. तोपर्यंत मृताची अवहेलना होऊ नये यासाठी नांदगाव खंडेश्वर येथून तात्पुरता बोलावलेल्या फ्रीजरची तसेच एसी रूमचा उपयोग हा मृतदेह ठेवण्यासाठी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या एसी रूममध्ये ठेवू मृतदेह
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तसेच या ठिकाणी अनेक अपघात, आकस्मिक मृत्यू झालेल्या इसमांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जातात. परंतु येथील शवविच्छेदनगृहातील फ्रीजरच बंद असल्याने मृतदेहांतून दुर्गंध येत असल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाला यापूर्वीच केली होती; परंतु त्यांनी याची दखल घेतली नसल्याचे भीम ब्रिगेड संघटनेचे म्हणणे आहे. अखेर पुन्हा एकदा याप्रश्नी घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिले आहे. त्यांनी चार दिवसांमध्ये नवीन फ्रीजर शवविच्छेदनगृहात येणार असल्याचे सांगीतले आहे. त्यामुळे या चार दिवसांमध्ये जर नवीन फ्रीजर शवविच्छेदनगृहात आले नाही, तर मृतदेह हे जिल्हाधिकारी तसेच शल्य चिकित्सकांच्या एसी रूममध्ये ठेवू असा इशारा भीम ब्रिगेड संघटनेचे राजेश वानखडे यांनी दिला आहे.
नातेवाइकांसाठी बसण्याची व्यवस्था करा
शवविच्छेदनगृहाबाहेर अनेक नातेवाईक हे मृतदेह घेण्यासाठी येतात. या ठिकाणी मृतदेह मिळण्यासाठी कधी कधी एक ते दीड तासाचा अवधी लागतो. त्यामुळे नातेवाईक उन्हामध्ये झाडांच्या सावलीत रस्त्यावरच उभे राहतात. नातेवाइकांना बसण्यासाठी असलेला हॉल बंदच राहत असल्याचे भीम ब्रिगेडचे म्हणणे आहे. त्यामुळे हा बंद हॉलची स्वच्छता करून तो नातेवाइकांना बसण्यासाठी खुले करण्याची मागणीदेखील यावेळी संघटनेने केली.
शवविच्छेदनगृहातील बंद फ्रीजरसंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली होती. त्याप्रकारे नव्याने फ्रीजरही बोलविण्यात आले आहेत. चार ते पाच दिवसांमध्ये हे फ्रीजर रुग्णालयात पोहोचतील. तोपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी नांदगाव खंडेश्वर येथून जास्तीचा असलेला एक फ्रीजर शवविच्छेदनगृहात लावण्यात आला आहे.
डॉ. प्रमोद निरवणे, जिल्हा शल्य चिकित्सक