फेसबुक फसवणुकीचा नवा फंडा! जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने QR कोडचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:09 IST2025-06-24T13:09:06+5:302025-06-24T13:09:35+5:30
पोलिस ठाण्यात धाव : तक्रारी वाढण्याची अधिक शक्यता

New Facebook scam! QR code used in the name of the District Magistrate
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने बनविण्यात आलेल्या फेक अकाउंटमुळे चांदूरबाजार तालुक्यातील एका तरुणाला ६२ हजार रुपयांचा फटका बसला. ते फेक अकाउंट डीअॅक्टिव्हेट होण्यापूर्वीच तो प्रकार घडल्याचे सोमवारी दुपारी स्पष्ट झाले. आपल्या मुलाची फसवणूक झाल्याचे समजताच त्याच्या आईने अमरावती शहर गाठले. तिला तक्रारीसाठी चांदूरबाजार पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले.
सायबर भामट्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे कार्यालयातील खुर्चीवर बसलेले छायाचित्र असलेले एक फेक अकाउंट फेसबुकवर तयार केले. त्या अकाउंटवरून त्या आरोपीने २२ जून रोजी अनेकांना 'हाय' असा मॅसेज केला. त्यावर रिप्लाय देणाऱ्यांना सायबर भामट्याने आपण जिल्हाधिकारीच बोलत असल्याचे भासवले.
माझे संतोषकुमार नामक चांगले मित्र आहेत, ते सीआरपीएफला अधिकारी आहेत. त्यांची आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील जुने फर्निचर विकायचे आहे. तुम्हाला घ्यायचे असेल तर मी त्यांना तुमच्यासोबत बोलायला सांगतो. तसेच त्यांचा मोबाइल क्रमांक तुम्हालासुद्धा देतो आहे, असे मॅसेज करून संतोषकुमार नाव लिहिलेला एक मोबाइल क्रमांक पाठवला. मॅसेजला रिप्लाय देणाऱ्या प्रत्येकाला त्या आरोपीने अशाचप्रकारे मॅसेज केले.
चांदूरबाजार तालुक्यातील मुलगा भुललाच; तक्रार प्रक्रियेत
- चांदूरबाजार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलानेसुद्धा त्या मॅसेजला रिप्लाय दिला. त्यावर त्याला फर्निचर खरेदी करण्यासाठी आरोपीकडून एक क्यूआर कोड पाठविण्यात आला.
- हा क्यूआर कोड आल्यानंतर त्या मुलाने सुरुवातीला ५५ हजार, नंतर ५ हजार व शेवटी २ हजार अशा पद्धतीने एकूण ६२ हजार रुपये पाठवले. मात्र काही वेळाने हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे समोर आले.
- दरम्यान, या प्रकरणी फसवणूक झालेल्या मुलाच्या आईने सोमवारी ग्रामीण पोलिसांचे सायबर पोलिस ठाणे गाठून या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात तक्रारीवरून चांदूर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.