...अन् त्या चिमुकल्यानं डोळे उघडण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:41 PM2019-07-30T17:41:55+5:302019-07-30T17:44:05+5:30

मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव

new born baby died after delivery done without ambulance in chikhaldara | ...अन् त्या चिमुकल्यानं डोळे उघडण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

...अन् त्या चिमुकल्यानं डोळे उघडण्यापूर्वीच घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

- नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : पहिली प्रसूती असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. प्रसूतिकळा सुरू झाल्याने गर्भवतीला चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती होऊ शकत नसल्याचा शेरा डॉक्टरांनी दिला. त्यामुळे अचलपूरच्या रस्त्याने डॉक्टरविना धावणाऱ्या रुग्णवाहिकेत घाटवळणातच तिची प्रसूती झाली. उपचाराअभावी बाळ दगावले. डोके सुन्न करणारा हा प्रकार सोमवारी रात्री घडला. मेळघाटात पुन्हा एका बालकाने डोळे उघडण्यापूर्वी अखेरचा श्वास घेतला. त्या मातेवर आता अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत आहे. 

यशोदा रामकिसन दहीकर (२२, रा. मोथा) असे आदिवासी मातेचे नाव आहे. तिला २८ जुलै रोजी रात्री ९ च्या दरम्यान प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे सहा किलोमीटरवरील चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  गर्भ पायाळू आहे आणि रुग्णालयात योग्य सुविधांअभावी ही प्रसूती धोकादायक असल्याचे डॉक्टर संजय पवार यांनी सांगितले. ‘१०८’ रुग्णवाहिका अन्य रुग्णास घेऊन गेल्यामुळे ‘१०२’ रुग्णवाहिकाद्वारे तिला रवाना करण्यात आले. डॉक्टरविना धावत असलेल्या रुग्णवाहिकेत आशा आणि नातलग होते. घाटवळणातून आडनदी गावानजीक रुग्णवाहिकेत तिची प्रसूती झाली. एवढेच नव्हे तर पुढे रस्त्यावरील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका वळविण्यात आली. मात्र, तेथे कुणीच डॉक्टर न मिळाल्याने  बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप यशोदाचे पती रामकिसन बाबूलाल दहीकर यांनी केला.

सुविधांचा अभाव; कुठे आहे यंत्रणा अलर्ट?
मेळघाटात पावसाळ्यात चार महिने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा दावा शासनाकडून वारंवार केला जात असताना बालमृत्यूचे प्रमाण थांबत नसल्याचे वास्तव आहे. आरोग्यमंत्र्यांनी दौरे करून प्रशासनाला दिलेले निर्देश हवेत विरले आहेत. दुसरीकडे तालुकास्तरीय ग्रामीण रुग्णालयात पायाळू बालकाची प्रसूती करण्याची सुविधा नसल्याने बालक दगावत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. अशावेळी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाचा कशासाठी, हा प्रश्न निर्माण झाला आहे

ग्रामीण रुग्णालयात पायाळू बालकाची प्रसूती करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पायाळू असल्याची माहिती आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना होती. वेळेपूर्वीच गर्भवतीला दाखल करणे गरजेचे होते. 
- संजय पवार, वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा
 

Web Title: new born baby died after delivery done without ambulance in chikhaldara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.